एक्स्प्लोर
Advertisement
'पद्मविभूषण' देशातील शेतकऱ्यांना समर्पित : शरद पवार
पुणे: पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया 'एबीपी माझा'ला दिली. पद्मविभूषणा पुरस्काराचं श्रेय शरद पवारांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांना दिलं. जाहीर झालेल्या पद्मविभूषणानंतर पवारांनी त्यांच्या 50 वर्षांच्या प्रवासावर आणि मिळणाऱ्या पुरस्कारावर प्रतिक्रिया दिली.
प्रश्न: पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया?
उत्तर: 'हा पुरस्कार देण्याआधी मला याबाबत विचारण्यात आलं होतं. आम्ही हा निर्णय घेत आहोत. तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का?' तेव्हा मी त्यांना विचारलं की, हा पुरस्कार मला नेमका कशासाठी दिला जाणार आहे? त्यावेळी मला त्यांनी याबाबत काही गोष्टी सांगितल्या.
एक... असं आहे की माझ्याकडे 10 वर्ष शेती खात्याची जबाबदारी होती. सुरुवातीला देश ज्या काही गोष्टी आयात करत होता त्या गोष्टी नंतर निर्यात करायला लागला. शेती स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनं तो 10 वर्षाचा कालखंड फार महत्वाचा होता. त्यावेळी तुमचं शेतीतील योगदान महत्वाचं होतं.
दुसरं असं की, प्रशासन यंत्रणेत राज्यात जेव्हा मी काम केलं. त्यावेळी आपाताकालिन परिस्थितीत प्रभावीपणे टाकलेली पावलं. त्यावेळी केलेली दोन कामं. ती म्हणजे लातूरचा भूकंप आणि मुंबईतील दंगली यावेळी मर्यादित काळात हाताळलेली परिस्थिती आणि घेतलेली खबरदारी.
तिसरी गोष्ट अशी सांगण्यात आली की, सतत पन्नास वर्ष राज्यातील विधीमंडळ आणि देशातील संसदेत राहण्याची संधी आणि सन्मान लोकांनी तुम्हाला दिला.
ही कारणं सांगितल्यानंतर मी असा विचार करतो की, शेतीचं उत्पादन वाढवायला त्या कालखंडात यश आलं. पण दोन घटकांना याचं यश आहे. शेतकरी, कष्टकरी आणि शेतीतील संशोधक यांना आहे.
प्रश्न: राजकारणासह खेळाच्या आणि इतरही क्षेत्रामध्ये तुमचा वावर असतो. हे सारं काही तुम्ही कसं काय सांभाळता?
उत्तर: खेळामुळे नव्या पिढीशी संपर्क राहतो. माझं वय 76 आहे. मला समाजकारणात काम करायचं असेल तर पंचविशीतील पिढीचा मूड काय हे जाणून घेण्यासाठी तशी संधी हवी. त्यासाठी अनेक व्यासपीठ आहेत. त्यातील स्पोर्ट हे एक व्यासपीठ आहे. मी जगाच्या, देशाच्या आणि मुंबईच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो किंवा देशाच्या कब्बडीचा, खो-खो संघटनांचा अध्यक्ष होतो. कुस्तीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. या संघटनांमुळे या सर्व क्षेत्राशी आणि तरुण पिढीशी संबंध राहतो. दुसरी एक गोष्ट सांगायला हरकत नाही. माझं जे स्थान आहे त्या स्थानाचा उपयोग या संघटना आणि खेळाडूंना होतो. त्याच्यामध्ये कुणाला समाधान मिळतं.
प्रश्न: तुमची आई आणि गुरु यांची आज आठवण येत असेल. त्याबद्दल काय सांगाल?
उत्तर: माझ्या आईला आज आनंदच झाला असता. तिच्या दृष्टीने एक गोष्ट अशी की, माझ्या घरात पद्म पुरस्कार मिळणारा मी तिसरा. एका आईचे तीन मुलं. एक अप्पासाहेब पवार यांना सर्वात आधी पद्मश्री पुरस्कार मिळाला. दुसरे प्रताप पवार यांना पद्मश्री मिळाला. त्यानंतर मला पद्मविभूषण. त्यामुळे एका मातेच्या तीन पुत्रांना पद्म पुरस्कार मिळतात. ती नक्कीच संतुष्ट झाली असती.
माझे गुरु यशवंतराव चव्हाण यांची आठवण कायमच येते. त्यांचा विचार घेऊनच आम्ही पुढे चाललो आहे. हे यश मिळविण्यामध्ये जसा सामान्य लोकांचा वाटा तसाच त्यांच्या विचाराचाही वाटा आहे.
प्रश्न: नव्या पिढीला काय सांगाल?
उत्तर: नव्या पिढीला एकच सांगायचं आहे की, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती ज्ञान मिळविण्याचा सतत प्रयत्न करा. असं कधीही समजू नका की, मला हे जमणार. तुम्ही त्यात उडी टाकली, धडपड केली तर तुम्हाला नक्कीच यश येतं.
माझ्या सार्वजनिक आयुष्यात, शैक्षणिक कालखंडात मी काही फार हुशार विद्यार्थी नव्हतो. पण एखाद्या गोष्टीत पडल्यावर त्याच्यात पूर्ण वाहून घ्यायचं ही भूमिका मी पहिल्यापासून स्वीकारली. त्यावेळी माझ्या आईकडून संस्कार झाले. सहाजिकच आई-वडिलांचे हे संस्कार शेवटी उपयोगी पडले.
प्रश्न: तुम्हाला काय करायचं राहून गेलं आहे?, आणि तुम्ही हा पुरस्कार कोणाला समर्पित कराल?
उत्तर: देशातील शेतकरी, कष्टकरी आणि विविध घटकांना हा पुरस्कार समर्पित करतो. देशासाठी, समाजासाठी काम करत राहायचं एवढंच.
VIDEO:
संबंधित बातम्या
शरद पवार यांना पद्मविभूषण, कोहली, साक्षी, दीपा मलिकला पद्मश्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
निवडणूक
Advertisement