(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान मोदींना BOSS म्हणणं, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या भाषणाचा भाग नव्हताच... एस. जयशंकर यांनी सांगितला किस्सा
S. Jaishankar: पंतप्रधान मोदींचा उल्लेख ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी 'द बॉस' म्हणून केला. खरं तर मोदींना बॉस म्हणणं हा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या भाषणाचा भाग नव्हताच... एस. जयशंकर यांनी सांगितला मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळीचा किस्सा.
S Jaishankar: तीन देशांचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवारी भारतात परतले. दिल्लीतील पालम विमानतळावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. यादरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान मोदींसोबत या परदेश दौऱ्यावर जाणं हे त्यांचं भाग्य होतं. जग आज भारताकडे आदरानं पाहत आहे, ते पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळेच, असंही ते म्हणाले. मोदींच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मोदींना Boss म्हणून संबोधल्याची. याबाबतचा किस्साही यावेळी जयशंकर यांनी सांगितला.
एस. जयशंकर (S Jaishankar) म्हणाले की, मी या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींसोबत गेलो होतो. मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की, जग आपल्या पंतप्रधानांना कसं पाहतं. सिडनी दौऱ्याचा संदर्भ देत ते म्हणाले, पंतप्रधान मोदींचा उल्लेख ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी 'द बॉस' म्हणून केला. खरं तर मोदींना बॉस म्हणणं हा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या भाषणाचा भाग नव्हताच. मोदींसाठी निघालेले शब्द त्यांच्या मनाचे होते. एस जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमानंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं होतं की, मोदींना 'द बॉस' म्हणणं माझ्या स्वतःच्या भावना होत्या. हा कोणत्याही कागदाचा किंवा भाषणाचा भाग नाही, या माझ्या स्वतःच्या भावना होत्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की ३ देशों की सफल यात्रा संपन्न हुई।
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 25, 2023
मेरे अनुभव के बारे में सुनिए: pic.twitter.com/5DRwFuZ8Us
पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी मोदींना गुरू संबोधलं
एस जयशंकर म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनीमध्ये उतरले तेव्हा पंतप्रधानांनी ज्या पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं ते सर्वांनीच पाहिलं. एस जयशंकर यांनी सांगितलं की, पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान मोदी माझ्यासाठी केवळ देशाचे पंतप्रधान नाहीत, तर ते माझ्यासाठी गुरु आहेत. पंतप्रधान मोदी हे विश्वगुरू आहेत. त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते. आजपर्यंत मी असं दृश्य पाहिलेलं नाही. हा कोणा एकट्याचा नाहीतर संपूर्ण जगाचा विचार होता.
परराष्ट्र मंत्री म्हणाले, जेव्हा ऑस्ट्रेलियासारख्या देशाचे पंतप्रधान म्हणतात तुम्ही बॉस आहात. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान म्हणतात की, तुम्ही विश्वगुरू आहात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आज जग भारताकडे ज्या प्रकारे पाहतंय, ते पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळेच. आज वेगवेगळ्या बैठकांमध्ये जी चर्चा होतेय, ती भारताच्या परिवर्तनाची आहे. लोकांना पीएम मोदींकडून जाणून घ्यायचं होतं की, तुम्ही कोरोनाच्या काळात कसं काम केलं, डिजिटल इंडिया कसं काम करत आहे, लसीकरण मोहिम कशी राबवली गेली? महामारीच्या काळात 80 कोटी लोकांना मोफत रेशन कसं दिलं गेलं? या दौऱ्यावर जाता आलं, मी खरंच भाग्यवान आहे.
बायडन यांनी मोदींचा मागितला ऑटोग्राफ : जयशंकर
याशिवाय जपानमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींचा ऑटोग्राफ मागितला होता, ही त्यांची वैयक्तिक इच्छा होती. एस. जयशंकर म्हणाले की, बायडन पंतप्रधान मोदींचा खूप आदर करतात. त्यानं सांगितलं की, माझ्यावर इतकं दडपण आहे, मोदी येणार म्हणून बऱ्याच लोकांना डिनरला यायचं आहे.