आरएसएसचा पुढचा अजेंडा लोकसंख्या नियंत्रण, मोहन भागवतांचे संकेत, कायदा करण्याचीही मागणी
देशात आता 2 अपत्यांच्या कायद्याची गरज असल्याचं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. संघाचा पुढचा अजेंडा लोकसंख्या कायद्याचा असू शकतो, असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

लखनौ : देशात आता 2 अपत्यांच्या कायद्याची गरज असल्याचं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. संघाचा पुढचा अजेंडा लोकसंख्या कायद्याचा असू शकतो, असंही भागवत यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीत मोहन भागवत बोलत होते. बंद सभागृहात ही बैठक पार पडली.
दोन अपत्यांच्या कायद्यासंदर्भात देशभरात संघाकडून जनजागृती अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती भागवत यांनी यावेळी दिली. दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत केंद्र सरकारने माघार घेण्याची गरज नाही, असे मत मांडत सरसंघचालकांनी मोदी सरकारची पाठराखण केली आहे.
भागवत म्हणाले की, राम मंदिर बांधणे हा आपला प्रमुख अजेंडा होता. त्यासाठीची न्यायालयीन लढाई आपण जिंकली असून लवकरच भव्य राम मंदिराची निर्मिती होणार आहे. तसेच केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणला आहे. त्यावरुन केंद्राने आता मागे हटण्याची आवश्यकता नाही.
बंद सभागृहात भागवतांनी आरएसएसशी संबंधित लोकांशी संवाद साधला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी भागवत म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रण कायदा हे आपलं पुढचं पाऊल असेल. वाढत्या लोकसंख्येवर अंकुश बसावा, यासाठी या कायद्याची आवश्यकता आहे. राम मंदिर बांधल्यानंतर संघ या मुद्द्यापासून पूर्णपणे वेगळा होणार आहे.
भागवत म्हणाले की, काशी आणि मथुरा संघाच्या अजेंड्यावर कधीही नव्हते, भविष्यातही संघाचा या मुद्द्यांशी संबंध नसेल. संघ आता दोन अपत्यांच्या कायद्यासंदर्भात देशभरात जनजागृती अभियान राबवणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
