भाजपचे खासदार उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेणार
महाराष्ट्राच्या भुवया उंचावणारी मोठी राजकीय घडामोड दिल्लीत घडणार आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी मोठी घडामोड दिल्लीत घडणार आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर उदयनराजे यांची ही पहिलीच भेट आहे.
उदयनराजे भोसले आज संध्याकाळी साडेपाच वाजता शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी भेटीला जातील. या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार याची उत्सुकता लागली आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. शरद पवार आणि उदयनराजे हे दोघेही राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे दोघांची सदनामध्येही भेट होऊ शकते. परंतु ज्या अर्थी उदयनराजे पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेणार असल्याने या भेटीला विशेष महत्त्व आहे.
सप्टेंबर 2019 मध्ये उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सप्टेंबर 2019 मध्ये उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आधीच गळती लागलेल्या राष्ट्रवादीला उदयनराजे यांच्या राजीनाम्याने आणखी एक धक्का बसला.
शरद पवारांची पावसातली 'ती' सभा आणि उदयनराजेंचा पराभव विधानसभा निवडणुकीच्या काळात सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली आणि शरद पवारांनी ती प्रतिष्ठेची केली. 18 ऑक्टोबर 2019 रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानात राष्ट्रवादीची जाहीर सभा होती. यावेळी पावसानेही हजेरी लावली. परंतु 80 वर्षांच्या शरद पवारांनी तरीही माईक हातात घेत उपस्थितांना शाब्दिक सल्ले दिले. पवारांच्या भाषणाने इतिहास घडला. लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या पराभाव झाला. त्यांच्या पराभवाला शरद पवारांचं हे भाषणच कारणीभूत ठरल्याचं म्हटलं गेलं. यानंतर भाजपने उदयराजेंना राज्यसभेवर पाठवलं.