BJP Meeting in Rajasthan: काँग्रेसच्या शिबिरानंतर आता भाजप कार्यकारिणीची राजस्थानमध्ये बैठक, 'या' मुद्यांवर होणार चर्चा
20 आणि 21 मे रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी राजस्थानमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे.
BJP Meeting in Rajasthan : राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुकतेच काँग्रसचे चिंतन शिबिर पार पडले. त्यानंतर आता भाजपनेही राजस्थानमध्ये बैठक आयोजीत केली आहे. 20 आणि 21 मे रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे. या बैठकीत संघटना आणि सरकारची ताकद, निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी धोरणात्मक रणनिती यासह विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मतभेत आहेत. ते अद्याप दूर होऊ शकले नाहीत. तसेच भाजपमध्ये देखील वसुंधरा राजे आणि सतीश पुनिया यांच्यात दुरावा आहे. हा दुरावा भाजपला मिटवता येईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या नावाने निवडणूक लढवली जाईल
वसुंधरा राजे यांच्या गटाला त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवायला हव्यात असे वाटत आहे. कारण विजयी झाल्यास वसुंधरा राजेंना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळेल असे त्यांना वाटत आहे. एकप्रकारे वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनविण्यावर भर दिला जात आहे. मात्र, भाजप हायकमांडने ही निवडणूक पंतप्रधान मोदींच्या नावावरच लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट केले आहे. निवडणूक जिंकल्यावर मुख्यमंत्री कोण होणार पक्ष ठरवेल. हायकमांडला जो चेहरा हवा आहे त्यालाच मुख्यमंत्री केले जाईल. त्यामुळे वसुंधरा राजे यांचाच नंबर लागेल हे सांगणे कठीण आहे.
मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार आहेत
राजस्थानमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी अनेकडण इच्छुक आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे यांचे नाव आघाडीवर आहे. पण हायकमांडच्या म्हणण्यानुसार, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पहिली पसंती आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतरच शेखावत यांना पुढे करायचा निर्णय हायकमांडने घेतला होता, असे सांगितले जाते. ते एक राजपूत आहेत आणि जोधपूरचे आहेत. तिथून अशोक गेहलोत देखील येतात. त्यांनी गेहलोत यांचा मुलगा वैभवचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला आहे. दुसरीकडे प्रदेशाध्यक्षपदाची कमान सांभाळणाऱ्या सतीश पुनिया यांना आपली मेहनत वाया जाणार नाही, असे वाटते. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे. ओम माथूर, गुलाब चंद कटारिया हे देखील लाईनमध्ये दिसत आहेत. या सगळ्यात एकमेकांच्या भांडणाचा फायदा आपल्याला मिळू शकतो, असे सभापती ओम बिर्ला यांना वाटते. स्पीकर झाल्यानंतर ते कोटा या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाला भेट देत आहेत. दरम्यान, सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास या बैठकीत सर्वच घटकपक्षांची मान्यता मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार त्यावर भर दिला जाणार
भाजपच्या या बैठकीत येत्या दोन वर्षांत ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यावरही भर दिला जाणार आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये संघटन करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे सरकार आणि संघटना या दोघांनाही डोळ्यासमोर ठेवून येथे रणनीती आखली जाईल. आवश्यक तिथे मुख्यमंत्री बदलता येतील. जिथे दुफळी जास्त असते तिथे संघटनेत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन पद्धतीने संवाद साधतील. तर समारोपाचे भाषण हे जे पी नड्डा यांचे होईल. यावेळी मोदी विजयासाठी कोणता मंत्र देतात याकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.