राहुल गांधींना शिक्षा, काँग्रेस आक्रमक; शुक्रवारी दिल्लीमध्ये मार्च तर सोमवारी देशभरात प्रदर्शन, राष्ट्रपतींनाही भेटणार
Rahul Gandhi Case : राष्ट्रपतींना भेटण्याची वेळ मागितली आहे. सकाळी 10 वाजता विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक होणार आहे.
Rahul Gandhi Case : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने (Surat Court) दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनवली. मोदी अडनावासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर सूरत कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. सध्या राहुल गांधी यांना जामीन मिळाला असून 30 दिवसांपर्यंत यावर स्थगिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांना कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तर काँग्रेसने देशभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पक्षातील नेत्यांसोबत बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर काँग्रेस महासचिव जयराम रमेश म्हणाले की, ''शुक्रवारी सकाळी 11.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत विजय चौकात आम्ही एकत्र जमणार असून मार्च काढणार आहोत. आम्ही राष्ट्रपतींना भेटण्याची वेळ मागितली आहे. सकाळी 10 वाजता विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक होणार आहे. संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राज्य काँग्रेस अध्यक्षांसोबत बैठक करणार आहेत. सोमवारी दिल्ली आणि प्रत्येक राज्यात काँग्रेस पक्ष प्रदर्शन करणार आहे.''
मोदी सरकारवर आरोप -
जयराम रमेश म्हणाले की, ''मोदी सरकार सुडाचे राजकारण करत आहे. आम्ही मोदी सरकारविरोधात थेट लढत आहोत. आज आमची जवळपास दोन तास बैठक झाली. यामध्ये जवळपास 50 खासदार उपस्थित होते.'' हा फक्त न्यायालयीन विषय नाही. हा गंभीर राजकीय मुद्दा आहे, जो लोकशाहीशी जोडला आहे. हे मोदी सरकारच्या धमक्या, धमकावणे, सुडाचे आणि दडपशाहीच्या राजकारणाचे उत्तम उदाहरण आहे. याविरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. हा एक राजकीय लढाही आहे, आम्ही याला घाबरणार नाही, असे जयराम रमेश म्हणाले. तर काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल म्हणाले की, 'राहुल गांधी अदानी मुद्द्यावर बोलत आहेत, त्यामुळे त्यांना गप्प करण्यासाठी सरकार हे सर्व करत आहे. पण ना राहुल गांधी गप्प राहणार आहेत, ना काँग्रेस पार्टी गप्प राहिल.'
VIDEO | Congress leader @Jairam_Ramesh talks to media after a meeting of MPs and senior leaders at party president @kharge's residence. Earlier in the day, a Surat court sentenced Rahul Gandhi to 2 years imprisonment in the 2019 ‘Modi surname’ defamation case. pic.twitter.com/MeD5qjFkXM
— Press Trust of India (@PTI_News) March 23, 2023
काँग्रेस आव्हान देण्यास तयार -
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधीबद्दल सूरत कोर्टाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यावर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. जिल्हा न्यायालय अथवा सत्र न्यायालयात याप्रकरणी दाद मागत याप्रकरणी स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न आहे. याबाबत वकिलांसोबत चर्चा सुरु असून लवकरच याचिका दाखल करण्यात येणार आहे.
विरोधी पक्ष सपोर्टमध्ये -
याप्रकरणी देशभरातील विरोधी पक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सपोर्टमध्ये आले आहेत. आप पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'भाजपकडून देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना संपवण्याचा डाव आखला जात आहे. आमचे काँग्रेससोबत मतभेद आहेत, पण राहुल गांधींना अशा पद्धतीने अडकवणे चुकीचे आहे. जनता आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे काम सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे आहे. आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो पण या निर्णायाशी सहमत नाही.' तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही आपण राहुल गांधी यांच्यासोबत असल्याचे म्हटलेय. तर शरद पवार म्हणाले की, ' सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या नागरिकांचा, राजकीय पक्षांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असून ही बाब गंभीर आहे.'