'राहुल गांधी डोळ्यात डोळे घालून बोलू शकतात', विरोधी पक्ष नेता बनवण्याच्या प्रस्तावास काँग्रेसची मंजुरी
काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं, यासाठी विनंती केली आहे.
नवी दिल्ली : देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकानंतर भाजप नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (Prime minister) शपथ घेत आहेत. 9 जून राजो सायंकाळी राष्ट्रपती भवन येथे मोठ्या उत्साहात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजपाशासित राज्यातील सर्वच मुख्यमंत्री व प्रमुख नेते हजर राहणार आहेत. दुसरीडे विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड होणार याचीही उत्सुकता सर्वांना लागली असून काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राहुल गांधींना (Rahul Gandhi) विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राहुल गांधींच्या नावासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे, संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींचीच निवड होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं, यासाठी विनंती केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील राहुल गांधी यांना पक्ष सदस्यांच्या भावना मान्य करावे लागतील, असे म्हटले आहे. तर, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संसदेतील विरोधीपक्षनेतेपदासाठी राहुल गांधींच्याच नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याचं काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल राव यांनीही सांगितलं आहे. तर, काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून राहुल गांधींनी निवड झाल्याचंही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, राहुल गांधींच विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसू शकतात हे जवळपास निश्चित झालं आहे.
#WATCH | After the party's CWC meeting, Congress leader KC Venugopal says, "CWC (Congress Working Committee) unanimously requested Rahul Gandhi to take the position of the leader of opposition in Lok Sabha...Rahul ji is the best person to lead this campaign inside the… pic.twitter.com/s4tJkywQw3
— ANI (@ANI) June 8, 2024
राहुल गांधी डोळ्यात डोळे घालून बोलू शकतात
राहुल गांधी धाडसी आणि साहसी नेते आहेत, ते डोळ्यात डोळे घालून बोलू शकतात. ते महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती ठेवतात. त्यामुळे, त्यांनाच संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी जबाबदारी देण्यात यावी, अशी काँग्रेस कार्यकारणीच्या समितीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे, असे खासदार प्रमोद तिवारी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालात भाजपप्रणित एनडीए आघाडीला 294 आणि इंडिया आघाडीला 232 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे, बहुमताच्या जोरावर एनडीएन आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची गटनेतेपदी निवड केली आहे. घटकपक्षांनीही मोदींच्या नावावर एकमत केल्यामुळे आता 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तर, राहुल गांधींचीही विरोधी पक्षनेता म्हणून लवकरच अधिकृच घोषणा होऊ शकते.