(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना 'चंद्रशेखर आझाद' यांची साथ; व्हायरल फोटोतील चिमुकला नक्की आहे तरी कोण?
Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली 'भारत जोडो यात्रा' यावेळी एका फोटोमुळे चर्चेत आहे.
Bharat Jodo Yatra: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) विविध पक्षांचे नेते आणि सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. दरम्यान, या थंडीत राहुल गांधी फक्त टी-शर्ट घालून प्रवास करत असल्यामुळे आधीच चर्चा सुरू आहेत. यावरुन राहुल गांधींना थंडी वाजत नाही का? गोठवणाऱ्या थंडीत राहुल गांधी फक्त टी-शर्ट कसं काय परिधान करू शकतात? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे अनेक प्रश्न राहुल गांधींनाही विचारण्यात आले आहेत. एकिकडे या चर्चा सुरू असतानाच आता भारत जोडो यात्रेत आपल्या लूकमुळे आणखी एक व्यक्ती व्हायरल होत आहे.
भारत जोडो यात्रेसोबत दररोज अनेक लोक जोडले जात आहेत. या पदयात्रेतील नवनवे फोटो दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो शुक्रवारी (6 जानेवारी) चर्चेचा विषय बनला होता, ज्यात हरियाणातील भारत जोडो यात्रेत चंद्रशेखर आझादच्या लूकमध्ये 5 वर्षीय अभिमन्यू सहभागी झाला होता.
कैसे रुकें कदम, जब साथ हो 'आज़ाद' से एक मासूम के कदमों का... #BharatJodoYatra मुसीबतों की बेड़ियां पिघला चुकी है। pic.twitter.com/FHpmeoGWhz
— Srinivas BV (@srinivasiyc) January 6, 2023
काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी हा फोटो ट्वीट करून लिहिलंय की, "पावलं कशी थांबतील, जेव्हा सोबत 'आझाद' असतील. भारतानं संकटांच्या बेड्या पुन्हा वितळवल्या आहेत." भारत जोडो यात्रा शुक्रवारी (6 जानेवारी) हरियाणामध्ये पोहोचली. याचवेळी चिमुकला अभिमन्यू राहुल गांधींसोबत यात्रेत सामील झाला. राहुल गांधीच्या हात हातात देत, चिमुकला अभिमन्यू आपल्या छोट्याशा पावलांनी अंतर कापत होता. अभिमन्यूचा लूक चर्चेचा विषय ठरलाच. पण त्याचा आत्मविश्वासही सर्वांचा लक्ष वेधून घेत होता. दरम्यान, यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची जाहीर सभाही झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
भारत जोडो यात्रा हरियाणात
हरियाणात 21 ते 23 डिसेंबर या पहिल्या टप्प्यात 130 किलोमीटरचं अंतर भारत जोडो यात्रेनं पार केलं. नूह, गुरुग्राम आणि फरिदाबाद जिल्ह्यातून यात्रा मार्गस्थ झाली. भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये राहुल गांधी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. त्यानंतर शुक्रवारी (6 जानेवारी) पानिपत येथून दुसऱ्या टप्प्याचा प्रवास सुरू झाला.
मल्लिकार्जुन खर्गे यांचा मोदींवर निशाणा
पानिपत येथे एका मेळाव्यात अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम पुढील वर्षी 1 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, या घोषणेवरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची खिल्ली उडवली आणि शाह हेच राम मंदिराचे पुजारी आहेत का? असा सवाल केला.