Rahul Gandhi : काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधींची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी, पक्षाच्या कोअर कमिटीचा निर्णय
Parliament Session : काँग्रेसकडून लोकसभा अध्यक्षपदाचीही निवडणूक लढवण्यात येणार असून त्यासाठी के सुरेश हे विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार असतील.
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेता कोण या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावावर काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 2014 आणि 2019 साली काँग्रेसला आवश्यक संख्या नसल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळालं नव्हतं. यंदा मात्र ही संधी मिळाली असून त्या ठिकाणी राहुल गांधी यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षांना पत्र लिहून हा निर्णय कळवला आहे. राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून त्यांनी वायनाडच्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकरना पत्र लिहून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील अशी माहिती दिली आहे.
"Congress MP Rahul Gandhi has been appointed as the LoP in the Lok Sabha, says Congress general secretary KC Venugopal pic.twitter.com/8AYbBlkEbV
— ANI (@ANI) June 25, 2024
त्या आधी काँग्रेस पक्षाची एक बैठक झाली असून त्यामध्ये राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या गदारोळात हा निर्णय घेण्यात आला. भाजपने या पदासाठी ओम बिर्ला यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने के सुरेश यांना उमेदवारी दिली आहे.
यापूर्वी 9 जून रोजी काँग्रेस कार्यकारिणीने (CWC) राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला होता. CWC बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले होते की त्यांना यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.
सन 2019 च्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा 52 वरून 99 पर्यंत, म्हणजे जवळपास दुप्पट झाल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीत पक्षाला केवळ 44 जागा जिंकण्यात यश आले होते.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1
ही बातमी वाचा: