Ragging Case in Kerala: केरळमध्ये रॅगिंगचा किसळवाणा प्रकार, पाणी थुंकून ते प्यायला लावलं, तासभर मारहाण अन्..; 7 जणांना केलं निलंबित
Ragging Case in Kerala: केरळमधील एका सरकारी महाविद्यालयात वरिष्ठांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला थुंकलेले पाणी प्यायला लावण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पीडित विद्यार्थ्याला तासभर मारहाणही करण्यात आली.

Ragging Case in Kerala: केरळमधील एका सरकारी महाविद्यालयामध्ये रॅगिंगचे एक भयानक प्रकरण समोर आले आहे. तिरुअनंतपुरममधील एका सरकारी महाविद्यालयात सात सीनियर्सनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला तासभर मारहाण केली आणि थुंकलेले पाणी पाजण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने सातही सीनियर्सना निलंबित केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हे प्रकरण तिरुअनंतपुरम येथील करियावट्टम शासकीय महाविद्यालयाशी संबंधित आहे. या महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग सेलने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे हे धकाकादायक प्रकरण समोर आलं आहे. अहवाला नंतरच या सात सीनियर्सला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सातही विद्यार्थी केरळमधील सत्ताधारी पक्ष 'मारिस्ट कम्युनिस्ट पार्टी'ची विद्यार्थी शाखा 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'चे आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
11 फेब्रुवारी रोजी करियावट्टम शासकीय महाविद्यालयात सिनियर्स आणि ज्युनियर्समध्ये मारामारी झाली होती. यामध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी जखमी झाला. त्यानी सिनियर्सची पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांकडे तक्रार केल्याने सिनियर्सना आणखीच राग आला.
त्यानंतर या सिनियर्सनी तक्रारदार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या वसतिगृहात प्रवेश केला आणि त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. म्हणून त्यांनी तक्रारदार विद्यार्थ्यासोबत असणाऱ्या एका विद्यार्थ्याला सोबत नेलं. या विद्यार्थ्याला एसएफआयच्या ॲक्टिव्हिटी रूममध्ये आणण्यात आलं. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. पीडित विद्यार्थ्याने सांगितलं की, तिथे त्याला गुडघ्यावर बसवून मारहाण करण्यात आली.
सिनियर्सनी एक तासभर त्याला मारहाण केली. जेव्हा त्याने पिण्यासाठी पाणी मागितले तेव्हा त्याला थुंकून पाणी देण्यात आल्याचे पीडित विद्यार्थ्यांने सांगितले. हे पाणी पिण्यास नकार दिल्याने त्याला आणखी मारहाण करण्यात आली.
कॉलेज आणि पोलिसांची कारवाई
हे प्रकरण पोलिसांच्या हाती देण्यापूर्वी कॉलेजच्या अँटी रॅगिंग सेलने तक्रारीची कसून चौकशी केली. कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी तपासले. रॅगिंगचे प्रकरण स्पष्ट दिसत असतानाच त्यांनी सिनियर्स विरोधात निलंबनाची कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी रॅगिंग प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.























