शत्रूला धडकी भरवण्याठी राफेल येतंय....29 जुलैला भारतात दाखल होणार!
Rafale Fighter Jets | राफेल लढाऊ विमानांच्या सौद्यावरुन विरोधकांनी जोरदार रान उठवलं होतं. राहुल गांधींची चौकीदार चोर है ही घोषणाही विमानांच्या खरेदीवरुनच तयार झाली. आता भारत-चीन तणाव सुरु असतानाच भारतात महिनाअखेरीस राफेल लढाऊ विमानं मिळणार आहेत.
![शत्रूला धडकी भरवण्याठी राफेल येतंय....29 जुलैला भारतात दाखल होणार! Rafale Fighter Jets Indian Air Force will induct first batch of 5 fighter jets from France at the Ambala air base on July 29 शत्रूला धडकी भरवण्याठी राफेल येतंय....29 जुलैला भारतात दाखल होणार!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/10/08115130/Rafale-Jet.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारत आणि चीनमधील तणावाच्या स्थितीत सर्वात मोठं 'ब्रह्मास्त्र' भारताच्या भूमीवर दाखल होणार आहे. ज्याच्या नावाने शत्रू बिथरतं असं 'ब्रह्मास्त्र' म्हणजे राफेल लढाऊ विमान. भारतीय हवाई दलासाठी पर्यायाने भारतासाठी 29 जुलै हा दिवस अतिशय खास असणार आहे. कारण मोठ्या प्रतिक्षेनंतर या दिवशी भारताला अखेर राफेल लढाऊ विमानं मिळणार आहेत. पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली खेप 29 जून रोजी भारतात येणार आहे. ही विमानं अंबाला हवाई दलाच्या तळामध्ये ठेवली जातील. त्यानंतर ही विमानं कुठे तैनात करायची याबाबत निर्णय घेतला जाईल.
मात्र 29 जुलै रोजी हवामान कसं असेल हा देखील महत्त्वाचा मुद्दा असेल. या दिवशी पावसाची भूमिका महत्त्वाची असेल. मान्सूनमुळे आता उत्तर भारतात पाऊस सुरु आहे.
राफेल हे दोन इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे, ज्याची निर्मिती दसॉल्ट नावाच्या एका फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प ही दोन क्षेपणास्त्र आहेत, ज्यामुळे ते भारताला हवेतून हवेत मारा करण्याची अद्भुत क्षमता देईल. ही दोन्ही क्षेपणास्त्र राफेलचा यूएसपी आहे, असं म्हणता येईल.
सुरुवातीला चारच विमानं भारतात येणार होती. पण हवाई दलाच्या विनंतीनंतप फ्रान्सने पाच राफेल विमानं जुलैअखेरीस देण्याचं आश्वासन दिलं. 29 जुलै रोजी वायुदलात सामील झाल्यानंतर राफेल विमानं 20 ऑगस्ट रोजी एका सोहळ्यात वायुदलात औपचारिकरित्या दाखल केली जातील.
हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण भारतीय हवाई दलाच्या माहितीनुसार, "अधिकाऱ्यांनी राफेलच्या तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी याचं व्यापक प्रशिक्षण घेतलं आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी या लढाऊ विमानाची उच्च मारक क्षमतेचं खोलात अभ्यास केला आहे आणि आता ते यावर काम करण्यासाठई पूर्णत: तयार आहेत." राफेल विमानं दाखल होताच त्यांना लवकरात लवकर ऑपरेशन लेव्हलपर्यंत आणलं जाईल. म्हणजेच या विमानांचा विविध उद्देश्यांसाठी वापर केला जाईल, असं वायु दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
पुढील 2 वर्षात भारताला 36 राफेल विमानं मिळणार फ्रान्सकडून भारताला पुढील दोन वर्षांत 36 राफेल विमानं मिळणार आहेत. चीनसोबतच्या सुरु असलेला तणाव पाहता राफेल लडाखमध्ये तैनात केलं जाऊ शकतं. लडाखमध्ये दिवस असो किंवा रात्री, हिवाळा असो किंवा पावसाळा, प्रत्येक हवामानात हल्ला करण्याची क्षमता भारत विकसित करत आहे. यामध्ये राफेल हे भारताचं मोठं आणि प्रभावी शस्त्र ठरेल.
हवेतून हवेत मारा करणारं बियाँड व्हिज्युअल रेंज मिसाईल भारताला मिळणारं राफेल विमानात हवेतून हवेत मारा करणाऱ्या बियाँड व्हिज्युअल रेंज मिसाईल असेल. यामध्ये एक अॅक्टिव्ह रडार सीकरही आहे, ज्यामुळे क्षेपाणास्त्र कोणत्याही वातावरणात डागता येऊ शकतं. तर स्काल्प मिसाईल किंवा स्ट्रॉम शॅडो कोणतंही बंकर सहजरित्या उद्ध्वस्त करु शकतं. याची रेंज जवळपास 560 किमी आहे.
मिनिटांत शत्रूचा खात्मा उंचीवर असलेल्या एअरबेसहून उड्डाण करण्याची क्षमताही राफेलमध्ये आहे. चीन आणि पाकिस्तान सीमेवर थंड वातावरणातही हे विमाना वेगाने काम करु शकतं. क्षेपाणास्त्र हल्ल्याचा सामना करण्यासाठी विमानात विशेष तंत्रांचा वापर करण्यात आला आहे. राफेल एकाच वेळी जमिनीवरुन शत्रूचा हल्ला परतवण्यासाठी आणि आकाशात आक्रमण करण्यासाठी सक्षम आहे. गरज पडल्यास आण्विक शस्त्रांचाही वापर करता येऊ शकतो.
भारताच्या गरजेनुसार विमानात बदल राफेल लढाऊ विमानात भारताच्या गरजेनुसार अनेक बदल केले आहेत. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसाठी यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांना फक्त ऑपरेशनल माहितीच नाही तर याच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबतही माहिती देण्यात आली आहे.
59 हजार कोटींचा भलामोठा व्यवहार भारत सरकारने 2016 मध्ये फ्रान्स सरकारसोबत 36 राफेल लढाऊ विमानांचा व्यवहार केला होता. यासाठी भारताने 59 हजार कोटी रुपयांची भलीमोठी रक्कम मोजली होती. या व्यवहारावरुन देशातील राजकारण ढवळून निघालं होतं. या सौद्यात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त किंमतीत या विमानांची खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
राफेल मुद्दा, निवडणूक आणि काँग्रेस 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, राफेल विमानाच्या सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रान उठवलं होतं. राफेल सौद्यात रिलायन्सच्या अनिल अंबानी यांना फायदा पोहोचवला असा आरोप राहुल गांधींनी केला होता. यावेळी त्यांचं "चौकीदार चोर है" हे वाक्याही गाजलं होतं. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेलं होतं. परंतु राफेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारला क्लीन चिट दिली होती.
राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याने राजनाथ सिंह ट्रोल
राफेलची निमिर्ती दसॉल्ट या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. मागील वर्षी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्स दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी फ्रान्सने भारताला राफेल विमान सोपवलं. राफेल विमान ताब्यात घेताना भारतीय परंपरेनुसार राजनाथ सिंह यांन विमानावर ओम चिन्ह रेखाटत नारळ वाहिला होता. तसेच चाकाखाली लिंबू ठेवले होते. राफेलच्या या पूजेवरुन राजनाथसिंह सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले होते. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी काही मिम्स देखील तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. "मला जे योग्य वाटते तेच मी करतो. या विश्वात एक महाशक्ती आहे, अशी माझी श्रद्धा आहे. तसेच माझासुद्धा लहानपणापासून या गोष्टींवर विश्वास आहे," अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी या वादावर दिली होती.
संबंधित बातम्या
Rafale | राफेल विमान भारताला सुपूर्द, पहिल्या राफेल विमानातून संरक्षणमंत्र्यांचं उड्डाण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)