Farmers Protest | पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटी दोन्ही नेते शेतकरी आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेआधी ही भेट होणार आहे.
नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शेतकरी संघटना आणि सरकारमधील चर्चेआधी दिल्लीमध्ये ही भेट होणार आहे. शेतकरी आंदोलनावरुन पंजाब सरकारची आक्रमक भूमिका पाहता ही भेट अतिशय महत्त्वाची समजली जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह याआधीही अमित शाह यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. परंतु तेव्हा शाह आणि त्यांची भेट होऊ शकली नव्हती.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह सातत्याने केंद्राच्या तीन नव्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या संघर्ष योग्य असल्याचं सांगत तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज का ऐकत नाहीत? आणि या मुद्द्यावर हट्टाची भूमिका का असे सवालही उपस्थित केले होते.
आमचं सरकार या काळ्या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचा पुनरुच्चारही अमरिंदर सिंह यांनी केला. ते म्हणाले की, "जनतेचं ऐकणं हे सरकारचं काम आहे. जर अनेक राज्यांचे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत तर याचा अर्थ आहे की ते खरोखरच दु:खी आहेत."
यासोबतच हरियाणात शेतकऱ्यांच्या आंदोलनात बळाचा वापर केल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अमरिंदर सिंह यांनी यावरुन हरियाणा सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. अशा परिस्थितीत अमित शाह यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीत शेतकऱ्यांची मनधरणी करण्याबाबत मार्ग निघेल अशी अपेक्षा केली जात आहे.
अमित शाह यांची कृषीमंत्री, रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या चर्चेआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी (2 डिसेंबर) कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक घेतली होती. तोमर, गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी मंगळवारी (1 डिसेंबर) शेतकरी नेत्यांसोबतच्या चर्चेसाठी केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व केलं होतं. आता आज पुन्हा एकदा शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये बातचीत होणार आहे.
शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बुधवारी या तीन प्रमुख केंद्रीय मंत्र्यांनी चर्चा केल्याचं समजतं. नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांची चिंता दूर कशी करता येईल याबाबत या मंत्र्यांमध्ये चर्चा झाली.
नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 35 शेतकरी संघटनांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी फेटाळला होता. जवळपास दोन तासांच्या या बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचं एकमत होतं की, तिन्ही नवे कृषी कायदे बरखास्त करावेत. हे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
Farmers Protest: आता खाप पंचायतींचेही 'चलो दिल्ली', खट्टर सरकार पाडण्याची धमकी
32 वर्षांपूर्वीही एका शेतकरी आंदोलनानं दिल्लीला भरवली होती धडकी
Farmer Protest | पंजाबचे अमरिंदर सिंह गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार