Farmers Protest: आता खाप पंचायतींचेही 'चलो दिल्ली', खट्टर सरकार पाडण्याची धमकी
Farmers Protest: हरियाणातल्या खाप पंचायतींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवत दिल्लीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी आमदारांवर दबाब आणण्याचाही निर्णय घेतला आहे.
चंदीगड: राजधानी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. आज सातव्या दिवशीही अनेक शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडला आहे. आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला हरियाणातल्या खाप पंचायतींचेही समर्थन मिळालंय. आज हरियाणातल्या खाप पंचायती मोठ्या संख्येने दिल्लीकडे कूच करणार आहेत.
खाप पंचायतींच्या दिल्लीकडे जाण्याच्या निर्णयामुळे त्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखण्यासाठी हरियाणाच्या प्रशासनाने जागोजागी नाकाबंदी केली आहे. तर या प्रश्नावरुन खट्टर सरकार पाडण्याची धमकी खाप पंचायतींनी दिली आहे.
खाप पंचायतींच्या दिल्लीकडे जाण्याच्या घोषणेमुळे हरियाणात भूकंप झाला आहे. या खाप पंचायतींच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी खाण्या-पिण्याचे साहित्य नेण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपापल्या भागातल्या आमदारांवर खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी दबाब तयार करण्याचाही निर्णय खाप पंचायतींनी घेतला आहे.
मेवातच्या शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून तेही दिल्लीकडे जाणार आहेत. या जिल्ह्यातील जवळपास 30 शेतकऱ्यांना पोलीसांनी काल ताब्यात घेतलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसांनी दिल्ली-नोएडाकडे जाणारा चिल्ला महामार्ग बंद केला आहे.
कालच्या बैठकीत कोणताही निर्णय नाही काल केंद्र सरकारच्या वतीनं कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. पण या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. केंद्र सरकारने या विषयावर एक कमिटी स्थापन करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. परंतु अशी कमिटी स्थापन झाली तरी तिचा निष्कर्ष येईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचं शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला सांगण्यात आलंय. सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी रोज बैठक घेण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे.
सिंघु बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय की जोपर्यंत केंद्र सरकार नवी कृषी विधेयकं मागं घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार.
महत्वाच्या बातम्या: