पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा, पुरस्कार वापसीचा इशारा
आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. आम्ही शेतकऱ्यांसोबत त्यांच्या विरोधाचं समर्थन करणार आहोत त्यामुळे आम्ही हा पुरस्कार परत करत आहोत, असे बास्केटबॉलपटू सज्जन सिंग चिमा यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीच्या सीमेवर सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना देशा-विदेशातून पाठिंबा मिळत आहे. आता पद्मश्री सन्मानित आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला असून पुरस्कार वापसीचा इशारा दिला आहे.
अर्जुन पुरस्कारानं सन्मानित आणि पद्मश्री पुरस्कार कुस्तीपटू करतार सिंग, अर्जुन पुरस्कार प्राप्त बास्केटबॉलपटू सज्जन सिंग चिमा, अर्जुन पुरस्कारानं सन्मानित हॉकीपटू राजबीर सिंग यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून 5 डिसेंबरला राष्ट्रपती भवनाबाहेर पुरस्कार ठेऊ असा इशारा देखील यावेळी दिला आहे.
कडाक्याच्या थंडीतही पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठी हल्ला करत बळाचा वापर करत सरकारने अमानुषपणे शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, हे निषेधार्ह आहे. या पद्धतीने आमच्या बांधवांना वागणूक मिळणार असेल तर, अशा पुरस्काराचे आम्ही काय करायचे? असा सवाल यावेळी उपस्थित केला. आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. आम्ही शेतकऱ्यांसोबत त्यांच्या विरोधाचं समर्थन करणार आहोत त्यामुळे आम्ही हा पुरस्कार परत करत आहोत, असे बास्केटबॉलपटू सज्जन सिंग चिमा यांनी म्हटले आहे.
सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अमानुषच नव्हे तर निषेधार्ह आहे, असं म्हणत महाराष्ट्रातील काही नामवंत लेखक, कवी मंडळींनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच हरयाणातील इतर खेळांडूना देखील या शेतकऱ्यांच्या पाठींब्यासाठी 5 डिसेंबरला सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. आज (1 डिसेंबर) दुपारी तीन वाजता विज्ञान भवनात सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठक संपली असून परवा पुन्हा बैठक बोलवली आहे. कायद्यावर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा केंद्राचा प्रस्ताव असून रोज चर्चा करण्याची तयारी आहे. चर्चेची आमचीही तयारी, पण ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे नाही, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या :