Pune Ajit Pawar : कार्ट्याच्या हाती कोयता दिसला तर पालकांनो तुम्हालाच आधी बोलवणार; अजित पवारांनी घेतली पालकांचीच शाळा
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पालकांना काही सल्ले दिले आहेत. पालकांनी मुलांकडे लक्ष द्यायला हवं, आता मुलांना पदरात घेतलं जाणार नाही, अशी तंबी त्यांनी पालकांना दिली आहे.
पुणे : पुण्यासह राज्यात सध्या गुन्हेगारीने कळस (Pune Crime news) गाठला आहे. त्यातच सर्व वयोगटातील मुलांचा गुन्हेगारीत समावेश आहे. पुण्या-मुंबईत गोळीबारासह कोयत्याच्या हल्ल्यांच्या घटनेतदेखील वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवरुन विरोधक सरकारवर टीका करताना दिसत आहे. थेट पोलीस ठाण्यातच गोळीबाराच्या घटना समोर आल्यानंतर राज्यात सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं विरोधक आरोप करतात. त्यातच आता अजित पवारांनी (Ajit Pawar) पालकांना काही सल्ले दिले आहेत. पालकांनी मुलांकडे लक्ष द्यायला हवं, आता मुलांना पदरात घेतलं जाणार नाही, अशी तंबी त्यांनी पालकांना दिली आहे.
अजित पवार पालकांना उद्देशून म्हणाले की, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पालकांनी मुलांकडे लक्ष द्यायची गरज आहे. 10 ते 12 वर्षांचे मुलं जर कोयते घेऊन शहरात फिरत असतील तर पालकांनी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली मुलं कुठे जातात आणि काय करतात हे पालकांना माहित असावं आणि त्यांच्या घरच्यांसोबत संभाषण ठेवावं, असा सल्लादेखील अजित पवारांनी पालकांना दिला आहे.
आई-वडिलांना बोलवून मुलांची कामगिरी सांगणार!
'कोयता गॅंगचा सुपडा साफ करुन टाकणार आहे. पालकांनो तुमच्या घरातल्या मुलांना सांगा कोयते घेऊन फिरत बसू नका. कोयता घेऊन 10-12 वर्षांचे कोयते घेऊन फिरतात पण वय नसल्याने कारवाई करताना अडचणी येतात, अशी पोलीस अधिकारी आम्हाला माहिती देत असतात. आता असं काही आढळलं तर आई-वडिलांना बोलवून मुलांची कामगिरी सांगणार आहोत,असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना नीट वागायला शिकवलं पाहिजे', असंही अजित पवार म्हणाले.
मुलांना पदरात घेतलं जाणार नाही!
'मुलाल जन्म दिल्यानंतर घरातला मुलगा किंवा मुलगी कशी वागते किंवा कशी बोलते, याकडे लक्ष देण्याचं काम आई वडिलांचं आहे. त्यासोबतच आपल्या मुलांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, याची माहिती ठेवायला हवी. एकदा चूक झाली मुलाला पदरात घ्या म्हणून अनेकजण येतात मात्र आता पदरात घ्यायची वेळ राहिली नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
पोलिसांसमोर मोठं आव्हान
सध्या पुण्यात कोयते हल्ले वाढत आहे. त्यात अनेक विशीतील मुलांचा समावेश असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. त्यातच आता ही गुन्हेगारी शालेय मुंलांपर्यंत येऊन पोहचली आहे. क्षृल्लक कारणावरुन एकमेकांचे मुडदे पाडल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. या सगळ्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोरआ आहे.
इतर महत्वाची बातमी-