(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pulse Polio | देशात आजपासून पोलिओ लसीकरणाची सुरुवात; 2 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार मोहीम
दरवर्षीप्रमाणे या वर्षी 31 जानेवारीला 'पोलिओ रविवार' किंवा 'पल्स पोलिओ लसीकरण दिवस' म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम पुढचे तीन दिवस सुरु राहणार आहे.
मुंबई: आज देशात आणि राज्यात पल्स पोलिओ लसीकरण दिवस साजरा करण्यात येतोय. त्या निमित्ताने बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमरावतीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते राज्यातील पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राज्यातील सर्व जिल्ह्यात त्या-त्या पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिओचे डोस देऊन लसीकरणाच्या अभियानाची सुरुवात केली जात आहे.
पल्स पोलिओ लसीकरण दिवसाच्या निमित्ताने राज्यातील पाच वर्षाच्या आतील कोणतेही बालक या लसीकरणाच्या अभियानापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतंय. लसीकरणाचे हे अभियान दुर्गम भागातही यशस्वी व्हावं यासाठी आरोग्य विभागाकडून मोबाईल पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
देशभरातही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. आजचा दिवस 'पोलिओ रविवार' किंवा 'पल्स पोलिओ दिवस' म्हणूनही ओळखला जातो. देशात पल्स पोलिओचे हे अभियान आता दोन फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि अंदमान-निकोबार या ठिकाणीही पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
Polio : पोलिओची लस कोरोनासाठी वापरता येऊ शकते? संशोधकांमध्ये वेगवेगळी मतांतर
भारतात पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच वर्षाखालील कमी वयाच्या 17 कोटी बालकांमध्ये हे लसीकरण करण्यात येतं. या वर्षाच्या कार्यक्रमात जवळपास 24 लाख स्वयंसेवक, 1.5 लाख निरीक्षक आणि इतर काही कर्मचारी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. हा जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने भारतात 1995 सालापासून पल्स पोलिओच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. देशातले एकही बालक पोलिओच्या लसीपासून वंचित राहू नये यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणी, बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि इतर अनेक पर्यटन स्थळांवर पोलिओची मोफत लस दिली जाते. 2014 साली भारत हा पोलिओमुक्त झाल्याचं प्रशस्तीपत्र जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं होतं. पण असं असलं तरी देशात अजूनही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येतोय.
कोरोना लॉकडाऊनमध्ये नवजात बालकांच्या आरोग्याशी खेळ, बीसीजी, पोलिओच्या लसीकरणात प्रचंड घट