Polio : पोलिओची लस कोरोनासाठी वापरता येऊ शकते? संशोधकांमध्ये वेगवेगळी मतांतर
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी 3 दशलक्ष बालकांचा जीव पोलिओच्या लसीमुळे वाचवला जातो. पोलिओच्या लसीमुळे शरीरात दीर्घकालीन प्रतिकारक शक्ती तयार होते.
नवी दिल्ली: जगभर कोरोनावरील लसीचे संशोधन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यादरम्यान एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, पोलिओच्या लसीचा वापर करुन तरुणांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होऊ शकते. नॅशनल इस्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीच्या संबंधित एका अभ्यासात असं सांगण्यात आले आहे की, जगभर कोरोनाचा कहर सुरु असताना, त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत असताना 10 वर्षाखालील मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. यासाठी त्यांना तोंडावाटे देण्यात येणाऱ्या पोलिओची लस कारणीभूत असल्याचे त्यांचे मत आहे.
जगभर कोरोनाचे संक्रमण वाढत चालले असताना त्यावर अजूनही प्रभावी लस मिळालेली नाही. कोरोनावरील लसीचे संशोधन करताना संशोधक पोलिओच्या लसीचा वापर कोरोनाच्या निर्मुलनासाठी करता येतो का याची खातरजमा करत आहेत. कोरोनावरील लसीचे संशोधन करताना वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या लसींचा वापर करता येतो का यावर संशोधकांचा अभ्यास सुरु आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच एप्रिलमध्ये सांगितले होते की कोरोनाचे निदान करण्यासाठी पोलिओची लस वापरु नये. त्यांनी हेही स्पष्ट केले होते की पोलिओची लस कोरोनाच्या निदानासाठी उपयोगी पडते असा कोणताही पुरावा सापडला नाही.कोरोनाच्या निदानासाठी पोलिओच्या लसीचा वापर करता येणे शक्य? जागतिक किर्तीचे संशोधक रॉबर्ट गॅलो यांनी यावर्षीच्या सुरवातीलाच सांगितले होते की पोलिओच्या लसीचा वापर कोरोनाच्या निदानासाठी होतो का यावर संशोधन व्हावे. .पोलिओची लस मनुष्याच्या रोगप्रतिकारक शक्तीला क्रियाशील बनवते. त्यामुळे त्याच्यावर संशोधन व्हावे असे त्यांचे मत आहे.
कोरोनाच्या व्हायरसने मनुष्याच्या शरीरात प्रवेश केला तर त्याच्या पहिला हल्ला हा शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. अशावेळी जर आधीच तोंडावाटे देण्यात येणारी पोलिओची लस दिली असेल तर मानवाचे शरीर सुरुवातीपासूनच संरक्षणाच्या तयारीत राहते. त्यामुळे कोरोनाच्या व्हायरसची शक्ती कमी होऊ शकते. मानवी शरीर आधीपासूनच अशा प्रकारच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार असल्याने कोरोनाच्या व्यापक प्रमाणातील प्रसारावर आळा बसेल असे रॉबर्ट गॅलो यांचे मत आहे.
काही संशोधकांच्या मते पोलिओची लस कोरोनापासून काही प्रमाणात संरक्षण करु शकेल. परंतु आता कोरोनावरील लसींचे संशोधन अंतिम टप्प्यात आले आहे आणि त्याची सुरक्षितताही तपासण्यात आल्याने पोलिओच्या लसीचा वापर या टप्प्यावर करणे अनावश्यक ठरेल. कोरोनाच्या परिस्थितीमुळे लाखो बालके पोलिओच्या लसीपासून वंचित राहिले आहेत.
पोलिओमायलितीस अर्थात पोलिओ या नावाने ओळखला जाणारा आजार पोलिओव्हायरसमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. पोलिओ व्हायरसमुळे शरीराच्या मध्यवर्ती मज्जाव्यवस्थेचे नुकसान होऊ शकते आणि त्याचा परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ शकतो, शरीराला काही प्रमाणात पॅरालिसीस येऊ शकतो. 1988 साली जागतिक पातळीवर पोलिओच्या उच्चाटनाच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. 2013 पर्यंत 99 टक्के पोलिओचे उच्चाटन करण्यात जगाला यश आले आहे. भारताने याआधीच देशात पोलिओचे उच्चाटन झाले आहे, असे जाहीर केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांत अजूनही पोलिओचे रुग्ण आढळत आहेत. पोलिओच्या लसीकरणाचा कार्यक्रम हा जागतिक पातळीवर व्यापक प्रमाणात घेण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत पुढाकार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या: