(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेस विधीमंडळ बैठकीत 106 आमदार उपस्थित, राजस्थान सत्तासंघर्षात प्रियांका गांधी यांची एन्ट्री
सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीनंतर गहलोत काहीसे रिलॅक्स दिसले. त्याचसोबत या सत्तासंघर्षात आता प्रियांका गांधी यांची एन्ट्री झाली आहे.
जयपूर : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण फडकावल्याने राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जयपूरमध्ये काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीला 106 आमदार उपस्थित होते. त्यामुळे गहलोत सरकारला तूर्तास दिलासा मिळाला आहे. या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या सचिन पायलटसह इतर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
जयपूरमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अविनाश पांडे, राज्यसभा खासदार के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन उपस्थित होते. या बैठकीला 106 आमदार उपस्थित राहिल्याने अशोक गहलोतही सरकारबाबत समाधानी दिसले. यावेळी त्यांनी व्हिक्टरी साईनही दाखवलं.
प्रियांका गांधी यांची एन्ट्री सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले होते. दोन दिवसांपासून राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्या संपर्क होता. मात्र सचिन पायलट यांची मनधरणी करण्यास राहुल गांधी यांना यश आलं नाही. मात्र आता यामध्ये प्रियांका गांधी यांनी एन्ट्री घेतली आहे. राजस्थानमधील राजकीय संकट दूर करण्याची जबाबदारी प्रियांका गांधी यांनी आपल्या खाद्यांवर घेतल्याचं समजतं.
राजस्थान विधानसभेतील पक्षीय बलाबल राजस्थान विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. बहुमतासाठी 101 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे 107 आमदार आहेत. तर भाजपकडे 72, इतर आणि अपक्षांचे 21 आमदार आहेत.
Rajasthan Government Crisis | काँग्रेस आमदारांच्या बैठकीत गहलोत यांची सरशी, 106 आमदार उपस्थित