PM Modi : ही बाब गांभीर्याने घ्या, कोणत्याही प्रकारच्या राजकारणात पडण्याची गरज नाही, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना
PM Modi : संसदेच्या सुरक्षेतील मोठ्या त्रुटींबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्ष करत आहेत. दरम्यान, पीएम मोदींचे वक्तव्य समोर आले आहे.
मुंबई : संसदेच्या सुरक्षेतील मोठ्या त्रुटींबाबत (Security Breach in Lok Sabha) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी 14 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांना सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे. एबीपी न्यूजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना हे प्रकरण गांभीर्याने घेण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणावरुन कोणत्याही प्रकराचे राजकारण करण्याची गरज नसल्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना दिल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी न्यूजला दिलीये. तसेच आपण सर्वांनी ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी असे आवाहन देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले आहे.
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून राज्यसभा आणि लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली जातेय. या गोष्टीमुळे राज्यसभा आणि लोकसभेत बराच गदारोळ देखील झाला. याच कारणास्तव काँग्रेसच्या टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या यांच्यासह 14 विरोधी सदस्यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी सभागृहातील जागेचा अवमान आणि अनादर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना देखील राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
सुरक्षेचे उल्लंघन होणे ही बाब गंभीर - मल्लिकार्जुन खरगे
बुधवार 13 डिसेंबर रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्द्यावरुन राज्यसभेत काही प्रश्न देखील उपस्थित केले. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सुरक्षेचे उल्लंघन ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा स्थितीत अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावे. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं की, काँग्रेससह इतर पक्ष राजकारण करत आहेत. राजकारण करण्यापेक्षा देशाला एकात्मतेचा संदेश द्यायला हवा. यानंतर विरोधी आघाडी 'इंडिया'ने सभागृहातून वॉकआउट केलं.
नेमकं प्रकरण काय?
लोकसभेच्या कामकाजादरम्यान बुधवार 13 डिसेंबर रोजी सागर शर्मा आणि मनोरंजन डी या व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावू लागले. संसदेत विषारी धूर सोडला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदार कोटकांनी पकडलं. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर मात्र प्रश्न उपस्थित झाले. धक्कादायक बाब म्हणजे खासदाराच्या प्रताप सिम्हा यांच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले. खासदारार प्रताप सिम्हा हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्याच शिफारसीवर आरोपीचा पास तयार करण्यात आला होता त्यामुळे या अनुषंगाने चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.