Parliament : संसदेच्या सुरक्षेवरून विरोधी पक्षांचा गोंधळ, कामकाजात अडथळा आणल्यावरून 15 खासदार निलंबित
Opposition MPs Suspended: लोकसभेचे 14 आणि राज्यसभेचा एक असे 15 खासदारांचे निलंबन करण्यात आलं आहे.
Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी आज संसदेत जोरदार हंगामा केल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. लोकसभेच्या 14 आणि राज्यसभेचा एक अशा एकूण 15 खासदारांचे आज निलंबन करण्यात आलं आहे. हे निलंबन संसदेचे अधिवेशन सुरू असेपर्यंत असणार आहे. त्यामध्ये बहुतांश खासदार हे काँग्रेसचे आहेत.
संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. त्यावेळी संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणानंतर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल या 15 खासदारांचे निलंबन करण्यात येत असल्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं.
या खासदारांच निलंबन -
लोकसभा खासदार -
- टीएन प्रथापन, काँग्रेस
- हीबी एडेन, काँगेस
- जोथिमनी, काँग्रेस
- राम्या हरिदास , काँग्रेस
- डीन कुरियाकोस, काँगेस
- बेनी बेहनन, काँग्रेस
- वी के श्रीकंदन, काँग्रेस
- मोहम्मद जावेद, काँग्रेस
- पीआर नटराजन, माकप
- कनिमोई करुणानिधि, द्रमुक
- के सुब्रमण्यन,
- एसआर पारथीबान, डीएमडीके
- एस वेंकटेशन, माकप
- मणिकम टैगोर, काँग्रेस
राज्यसभा खासदार-
- डेरेक ओब्रायान, तृणमूल
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत सांगितले की, बुधवारी घडलेली दुर्दैवी घटना ही लोकसभा सदस्यांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी होती आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या मुद्द्यावर कोणत्याही सदस्याकडून राजकारण अपेक्षित नाही, पक्षीय राजकारणाच्या वरती जाऊन काम करावे लागेल. सुरक्षेतील त्रुटींच्या अशा घटना यापूर्वीही संसदेत घडल्या असून तत्कालीन लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेनुसार कामकाज झाले आहे.
खासदारांच्या निलंबनावर जेडीयूचे अध्यक्ष लालन सिंह म्हणाले की, सरकारचे अपयश लपवण्यासाठी आज खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सरकार आपले अपयश लपवत आहे.
डेरेक ओब्रायन निलंबित
तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबनाबाबत विरोधी पक्षांच्या खासदारांनी राज्यसभेत गदारोळ केला. यानंतर राज्यसभेचे कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
विरोधी पक्षांची मागणी
आज सकाळी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर लिहिले की, "इंडिया आघाडीची मागणी आहे की बुधवारी संसदेत घडलेल्या अत्यंत गंभीर आणि धोकादायक सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात सविस्तर निवेदन दिले पाहिजे. त्यावर चर्चा व्हायला हवी. घुसखोरांना व्हिजिटर पास उपलब्ध करून देणाऱ्या भाजप खासदार प्रताप सिंहा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी."
ही बातमी वाचा: