President Kovind Speech: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती कोविंद यांनी केलं देशाला संबोधित
President Ram Nath Kovind Speech: भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संपूर्ण भारवासियांना संबोधित केले.
President Ram Nath Kovind Speech: उद्या (बुधवार) भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजेच आज (मंगळवार) देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संपूर्ण देशाला संबोधित केलं. त्यांनी सुरुवातीलाच देशात आणि परदेशांत राहणाऱ्या सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ''हा दिवस आपणा सर्वांना एकत्र बांधणारा आणि भारताच्या गौरवतेचा उत्सव आहे.'' तसंच यावेळी त्यांनी देशांत सध्या सुरु असलेल्या स्वच्छता अभियान आणि कोविड लसीकरणाबाबत बोलताना या दोन्ही कार्यांना इतकं मोठं करण्यात भारताच्या नागरिकांचाच मोठा हात असल्याचं ते म्हणाले.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, "गणतंत्र दिवस हा आपल्या देशात झालेल्या महान व्यक्तींना आठवण्याचा दिवस आहे. ज्यांनी देशाच्या स्वांतत्र्यांसाठी धाडसाने कार्य केलं देशवासियांमध्ये उत्साह जागवला, अशा महानायकांची आठवण आज आपण केली पाहिजे." यावेळी कोविंद यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आठवण आवर्जून काढली. ते म्हणाले, "दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 23 जानेवारी रोजी आपण सर्वांनी ‘जय हिंद’ ची घोषणा देणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी केली. नेताजी हे आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत." नेताजींसह कोविंद यांनी महात्मा गांधी यांचाही आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ''आपण 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक दिवस साजरा करतो. पण 1930 पासून 1947 पर्यंत दर 26 जानेवारी रोजी पूर्ण स्वराज्य दिवस साजरा केला जात होता. महात्मा गांधी यांनी देशवासियांना हा 'पूर्ण स्वराज्य दिवस' साजरा करायला शिकवलं होतं."
कोरोनाबाबतही केलं वक्तव्य
राष्ट्रपती कोविंद कोरोना महामारीबाबत बोलताना म्हणाले,"मला हे सांगताना अभिमान वाटतो की कोरोना महामारीविरुद्धच्या लढाईत आपण सर्वांनी एक असामान्य असा दृढ संकल्प आणि कार्यक्षमतेने कामगिरी केली आहे. या महामारीत आपण बरीच संकटं पाहिली, पण अनेकांचा जीव वाचवण्यातही आपण यशस्वी झालो आहे.'' तसंच पुढे बोलताना ते म्हणाले, "कोरोना महामारीचा प्रभाव अजूनही मोठ्या प्रमाणात असल्याने आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे.'' तसंच रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी झटणाऱ्या आरोग्यकर्मींचाही राष्ट्रपतींनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
संबंधित बातम्या
- Padma Awards : 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर; जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण
- Padma Awards : प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री, महाराष्ट्रातील 10 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव
- Happy Republic Day 2022 : या प्रजासत्ताक दिनी 'हे' देशभक्तीपर सिनेमे पाहाच!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha