Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीआधी विरोधकांत फूट? ममता बॅनर्जींच्या बैठकीवर इतर पक्ष नाराज असल्याची चर्चा
Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली बैठक ही एकतर्फी असल्याचे इतर पक्षांनी म्हटले आहे.
Presidential Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपविरोधात उमेदवार निश्चित करण्यासाठी विरोधकांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सुरुंग लागला असल्याची चर्चा सुरू आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधकांची 15 जून रोजी बैठक बोलावली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली ही बैठक एकतर्फी असल्याचे इतर पक्षांनी म्हटले. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे व इतर पक्षांनी याआधीच 15 जून रोजी बैठक घेण्याचे निश्चित केले आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली ही बैठक एकतर्फी आहे. अशा प्रकारचा प्रयत्न हा राष्ट्रपती निवडणुकीआधी विरोधकांना एकजूट करण्याच्या प्रयत्नांना धक्का लावण्यासारखे असल्याचे येचुरी यांनी म्हटले. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची एक बैठक याआधीच निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पत्र लिहून 15 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
सीताराम येचुरी यांनी सांगितले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासह इतर विरोधी पक्षाचे नेत्यांची बैठक याआधीच बोलावण्यात आली आहे.
येचुरी यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी यांनी मला एक पत्र पाठवले असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून समजले. साधारणपणे अशा प्रकारच्या बैठकी या परस्परांशी चर्चा करून ठरवल्या जातात. मात्र, ममता यांनी एकतर्फी पत्र लिहीले असल्याचे त्यांनी म्हटले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीवर इतर पक्ष नाराज आहेत. इतर वरिष्ठ नेत्यांना डावलून स्वत: ला भाजपविरोधी आघाडीचा चेहरा असल्याचे दाखवण्याचा ममता यांचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या बैठकीच्या तारखेबाबत झालेल्या चर्चेचा भाग नव्हत्या. तरीदेखील त्यांना बैठकीची माहिती कशी मिळाली, याबाबत काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
डीएमकेचे प्रतिनिधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, तेलंगना राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव किंवा इतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेतील बैठकीत का सहभागी होतील असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांचा अतातायीपणातील निर्णय हा भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे गणित काय असते? जाणून घ्या सोप्या शब्दात