Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे गणित काय असते? जाणून घ्या सोप्या शब्दात
Presidential Election 2022 : देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान कोण करतो, प्रत्येकाचे मत मूल्य किती, मतांची मोजणी कशी होते जाणून घ्या सर्वकाही...
Presidential Election 2022 : विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मतांसाठी देशातील स४व राज्यांचा दौरा करू शकतात. खासदार आणि विधानसभेचे आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात.
सध्या भाजपच्या नेतृत्वातील एनडीएकडे विरोधकांपेक्षा अधिक संख्या आहे. त्यामुळे एनडीएचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 50 टक्के मतदान एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला होता.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदार कोण?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा यांच्यासह राज्यांच्या विधानसभा, केंद्रशासित दिल्ली व पुदुच्चेरी यांच्या विधानसभांचे सदस्य हे मतदार असतात. विधानसभांचे 4120 आमदार, लोकसभेचे 543 खासदार, राज्यसभेचे 233 खासदार असे एकूण 4893 मतदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतात.
तर, राष्ट्रपती नामनिर्देशित बारा खासदार, संसद आणि विधानसभेतील नामनिर्देशित सदस्य आणि विधान परिषदांचे सदस्य या निवणुकीत मतदान करू शकत नाही.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक मतांचे गणित काय?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेज मतदान मोजले जाते. राज्यातील विधानसभा सदस्यांच्या एकूण संख्येला लोकसंख्येने भागाकार केला जातो. या भागाकारात एक हजार पटीने जी संख्या येईल ती त्या राज्यातील आमदारांचे मत मूल्य असणार आहे. देशभरातील 4120 आमदारांचे एकूण मत मूल्य हे 5,49,495 इतके आहे.
लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची एकूण संख्येला आमदारांच्या मूल्याने भागकार केला जातो. लोकसभेत 543 आणि राज्यसभेचे सदस्य 233 असे एकूण 776 खासदार आहेत. आता संसदेतील प्रत्येक सदस्याचे मूल्य हे 5,49,495/776 = 708 इतके होते. खासदारांची एकूण मते ही 776 आहेत. या संख्येला 708 या मत मूल्याने गुणाकार केल्यास हे मत मूल्य 5,49,408 इतके होते.
त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीतील आमदार आणि खासदारांची एकूण मते ही 10,98,903 इतकी होतात.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे निकष काय?
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निकष आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा भारतीय नागरीक असावा आणि त्याचे वय 35हून अधिक असावे. त्याशिवाय, त्याला किमान 100 आमदार, खासदारांचा पाठिंबा असावा. यामध्ये 50 सूचक आणि 50 अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करतात. हे आमदार, खासदार थेट निवडून आलेले प्रतिनिधी असावेत. एका उमेदवाराला अधिकाधिक चार नामांकने दाखल करता येतात.
मागील चार टर्मपासून उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती झालेच नाहीत
उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीपदी निवडण्याची एक अप्रत्यक्ष परंपरा रुजली होती. मात्र, मागील चार टर्मपासून उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीपदी नियुक्त झाले नाहीत. भाजपचे कृष्णकांत आणि भैरो सिंह शेखावत हे उपराष्ट्रपती होते. मात्र, त्यांना राष्ट्रपतीपदाची संधी मिळाली नाही. त्यांच्याऐवजी एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी संधी मिळाली. तर, दोन वेळेस उपराष्ट्रपती राहिलेल्या हामिद अन्सारी हे दोन वेळेस उपराष्ट्रपती झाले होते. मात्र, त्यांनाही राष्ट्रपतीपदासाठी संधी मिळाली नाही.