Belgaum news : उद्घाटनानंतर 24 तासांमध्ये रेल्वे पुलावर खड्डे; कंत्राटदाराला वीस लाखाचा दंड ठोठावला
Belgaum news : उद्घाटन केल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये बेळगावमधील रेल्वे ओव्हर ब्रिजवर खड्डा पडल्यामुळे रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांनी ब्रिजचे काम केलेल्या कंत्राटदाराला 20 लाखाचा दंड ठोठावला आहे.
Belgaum news : उद्घाटन केल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये बेळगावमधील रेल्वे ओव्हर ब्रिजवर खड्डा पडल्यामुळे रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांनी ब्रिजचे काम केलेल्या कंत्राटदाराला 20 लाखाचा दंड ठोठावला आहे. रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांनी ब्रिजची पाहणी करून डांबरीकरण आणि अन्य कामे व्यवस्थित झाली नसल्याचा ठपका ठेवला होता. कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल ब्रिजचे काम केलेल्या एम. व्ही. व्ही. वेणू कंपनीला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला. कंपनीने 20 लाख रूपये दंडाची रक्कम रेल्वे खात्याकडे जमा केली आहे. रेल्वे ओव्हर ब्रिज वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे रेल्वे खात्याने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. (Belgaum news)
मंगला अंगडी यांच्या हस्ते 12 ऑक्टोबर रोजी उद्घाटन
दरम्यान, खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते 12 ऑक्टोबर रोजी उद्यमबाग येथील तिसऱ्या रेल्वे गेटच्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे उदघाटन झाले होते. उद्घाटन झालेल्या दुसऱ्या दिवशीच नव्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर खड्डा पडल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाली होती. याबाबत बातम्या प्रसिध्द झाल्यावर ब्रीज काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवून खड्डा मुजवण्यात आला होता.
काँग्रेसकडून बुट्टीत नोटा घालून अनोखे आंदोलन
दरम्यान, काल अवघ्या 24 तासांमध्येच खड्डे पडल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बुट्टीत नोटा घालून आंदोलन करत निकृष्ठ कामाचा निषेध केला. काँग्रेसने बुट्टीत नोटा भरून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुट्टीत नोटा घालून रेल्वे ओव्हर ब्रिजवर मोर्चा काढला. भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.
पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांनी यावेळी केला. 40 टक्के कमिशन घेणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणाही मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी दिल्या. खड्डा पडलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बुट्टीतील नोटा ओतून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून निषेध केला.
पुलावर 35 कोटींचा खर्च
दरम्यान, या पुलावर 35 कोटींचा खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असतानाही उद्घाटन करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पुलाची कामे बाकी असतानाच उद्घाटन झाल्याने वाहतूक सुरु झाल्यानंतर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही रस्ता ठिकाणी खचल्याचेही दिसून आले.
इतर महत्वाच्या बातम्या