(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : पंतप्रधान मोदी 27-28 ऑगस्ट रोजी गुजरात दौऱ्यावर, दोन प्रमुख प्रकल्पांची करणार पायाभरणी
PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवार आणि रविवारी ( 27 आणि 28 ऑगस्ट) गुजरातला भेट देणार आहेत.
PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवार आणि रविवारी ( 27 आणि 28 ऑगस्ट) गुजरातला भेट देणार आहेत. 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान अहमदाबादमधील साबरमती काठावर खादी उत्सवाला संबोधित करतील. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान भुज येथील स्मृती वन स्मारकाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पंतप्रधान भुजमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता, पंतप्रधान गांधीनगरमध्ये भारतातील सुझुकीला 40 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.
खादी उत्सव -
पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, 2014 पासून, भारतात खादीच्या विक्रीत चार पट वाढ झाली आहे, तर गुजरातमध्ये खादीच्या विक्रीत आठ पटींनी लक्षणीय वाढ झाली आहे. खादी लोकप्रिय करणे, खादी उत्पादनांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांमध्ये खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा पंतप्रधानांचा सतत प्रयत्न असतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या अशाच प्रकारच्या कार्यक्रमात, खादी उत्सवाचे आयोजन केले आहे. गुजरातच्या विविध जिल्ह्यांतील 7500 महिला खादी कारागीर एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी चरख्यावर सूतकताई करतील. या कार्यक्रमात 1920 पासून वापरल्या जाणार्या विविध पिढ्यांमधील 22 चरख्यांचे "चरख्यांची उत्क्रांती" दर्शवणारे प्रदर्शन देखील असेल. त्यात स्वातंत्र्यलढ्यात वापरल्या जाणाऱ्या चरख्याचे प्रतीक असलेल्या “येरवडा चरखा” सारख्या चरख्यापासून ते आजच्या काळात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक नवनवीन शोध आणि तंत्रज्ञान असलेल्या चरख्यांपर्यंतचा समावेश असेल.
भूजमध्ये पंतप्रधान -
पंतप्रधान भूजमध्ये सुमारे 4400 कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. भूज जिल्ह्यातील स्मृती वन स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. पंतप्रधानांच्या अभिनव कल्पनेतून साकारण्यात आलेला हा एक स्मृती वनाचा प्रकल्प आहे. भूज येथे 2001 मध्ये झालेल्या भूकंपामध्ये प्राण गमवावे लागलेल्या सुमारे 13,000 लोकांच्या मृत्यनंतर लोकांनी जो संयमीपणा दाखवला, त्यांच्या भावनेला, धैर्याला, त्यांच्यातल्या चैतन्यशील वृत्तीला मानवंदना देण्यासाठी सुमारे 470 एकर परिसरामध्ये हे स्मृतीवन तयार करण्यात आले आहे. या स्मारकामध्ये भूकंपामध्ये प्राण गमावलेल्या लोकांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
गांधीनगरमध्ये पंतप्रधान -
सुझुकी कंपनीला भारतामध्ये येऊन 40 वर्ष झाली, यानिमित्त गांधीनगरच्या महात्मा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान भारतातील सुझुकी समूहाच्या दोन प्रमुख प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यामध्ये गुजरातमधील हंसलपूर येथे सुझुकी मोटार गुजरात इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीचे उत्पादन सुविधा निर्माण करीत आहे, त्याची पायाभरणी करण्यात येईल. तसेच हरियाणातल्या खरखोडा येथे मारूती सुझुकीच्या आगामी वाहन निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात येणार आहे.