(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं केदारनाथचं दर्शन, विरोधकांची टीका
अर्धा तासाच्या पूजेनंतर मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना हात दाखवत अभिवादन केलं. उद्या म्हणजे रविवारी नरेंद्र मोदी बद्रीनाथचा दौरा करणार आहेत.
देहरादून : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात चौथ्यांदा केदारनाथचं दर्शन घेतलं. मागील दीड महिन्यापासून सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. त्यामुळे थकवा दूर करण्यासाठी आणि देवदर्शनासाठी मोदी केदारनाथला पोहोचले. यावेळी मोदींनी रुद्राभिषेक करुन शिव आराधना केली.
याआधी नरेंद्र मोदींनी केदारनाथला जाताना एकदाही काठीचा वापर केला नव्हता. मात्र आजच्या दौऱ्यात पहिल्यांदा नरेंद्र मोदी काठी हातात घेऊन केदारनाथच्या दर्शनाला पोहोचले.
मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर केदारनाथच्या तीर्थ पुरोहितांनी मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर पूजा करण्यासाठी नरेंद्र मोदींनी मंदिरात प्रवेश केला. जवळपास अर्धा तासाच्या पूजेनंतर मोदींनी केदारनाथ मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना हात दाखवत अभिवादन केलं. उद्या म्हणजे रविवारी नरेंद्र मोदी बद्रीनाथचा दौरा करणार आहेत.
नरेंद्र मोदींना 2014 साली सरकार स्थापनेसाठी कुठल्याही घटक पक्षाची गरज पडली नाही. मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यांनी स्वबळावर सरकार स्थापन केलं होतं. 2019 चा निकाल येण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. मात्र यंदा मोदींना पूर्ण बहुमत मिळणार का? हा प्रश्न आहे. भाजपाध्यक्ष अमित शाहांनी 300 जागा जिंकण्याचा विश्वास असला तरीही ते एनडीएतील घटक पक्षांना चुचकारण्याची एकही संधी सोडत नाहीत.
मोदींच्या देवदर्शनावर विरोधकांची टीका
नरेंद्र मोदींनी कितीही देवदर्शन आणि पूजा केली तरी, भाजपचा पराभव अटळ असल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादीनं केली आहे. मोदींच्या केदारनाथ दौऱ्याकडे प्रचारतंत्राचा भाग म्हणून पाहिलं पाहिजे. पाच वर्षात विकासकामे केली नाहीत, त्यामुळे मतदार त्यांना नाकारणार आहेत, हे त्यांना कळालं आहे. त्यामुळे आता देवाचे पाय धरण्याकरता मोदी केदारनाथला पोहोचले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तर विरोधकांनी मंदिर दर्शनाचं राजकारण करु नये, अशी प्रतिक्रिया सेना-भाजप प्रवक्त्यांनी दिली आहे.