Purvanchal Expressway : पंतप्रधानांच्या हस्ते पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन; सी-130जे सुपर हरक्युलिस एयरक्राफ्टनं रवाना होणार
Purvanchal Expressway Inauguration: पंतप्रधानांच्या हस्ते पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी मोदी सी-130जे सुपर हरक्युलिस एयरक्राफ्टनं उत्तर प्रदेशला रवाना होणार आहेत.
Purvanchal Expressway Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज 341 किलोमीटर लांबीच्या पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन करणार असून त्यासाठी ते आज उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी लॉकहिड मार्टिन सी-130 हेरकयूलिसहून दुपारी दीड वाजता पूर्वांचल द्रुतगती महामार्गावर पोहोचतील. पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहतील.
341 किलोमीटर लांबीच्या पूर्वांचल द्रुतगती महामार्गाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी संबोधितही करणार आहेत. दरम्यान, पूर्वांचल द्रुतगती महामार्ग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर जवळपास अर्ध्या तासाच्या एअरशोचंही आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये फायटर जेट सुखोई, मिराज देशाच्या ताकदीचं प्रदर्शन करणार आहेत.
पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन होण्यासोबतच द्रुतगती महामार्गावर तयार करण्यात आलेल्या रन-वेवर इंडियन एअरफोर्सचे फायटर जेट एअर शो करणार आहेत. या एअर-शोच्या माध्यमातून ते आपल्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रदर्शन करतील, त्यासाठी द्रुतगती महामार्गावर सुलतानपूरमधील कुरेभर गावाजवळ 3.2 किमी लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली आहे. सुखोई आणि मिराज ही लढाऊ विमाने फ्लायपास्ट करतील. एअर शो दुपारी 2.40 वाजता सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काल (सोमवारी) म्हणजेच, कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावाही घेतला.
पूर्वांचल द्रुतगती महामार्ग बनवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च
हा संपूर्ण 341 किमी पूर्वांचल द्रुतगती महामार्ग बनवण्यासाठी सुमारे 22 हजार 495 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा महामार्ग राज्यातील नऊ जिल्ह्यांना (लखनौ, बाराबंकी, अमेठी, सुलतानपूर, अयोध्या, आंबेडकर नगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर) जोडलेला आहे.
अखिलेश यादव यांनी केले होते आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुलतानपूर जिल्ह्यात सुमारे 23 हजार कोटी रुपये खर्चू करुन बांधण्यात आलेल्या एक्स्प्रेस वेच्या उद्घाटनापूर्वीच राजकारण सुरु झालं आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काल (सोमवारी) पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. भाजपनं गेल्या सरकारच्या योजना चोरल्याचा आरोप अखिलेश यांनी लावला.
ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर सपाच्या कार्यकाळातील योजनांचे नाव बदलून श्रेय लाटल्याचा आरोप केला. त्यांनी भाजपच्या आधी या एक्स्प्रेस वेचे उद्घाटन केलं असल्याचा दावा केला. सोशल मीडियावर एक छायाचित्र ट्वीट करून त्यांनी सांगितले की, डिसेंबर 2016 मध्ये त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात या एक्सप्रेस वेचे उद्घाटन करण्यात आलं होतं.