पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर, 339 कोटींच्या कामाचं करणार उद्घाटन
Kashi Vishwanath Corridor: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून म्हणजेच येत्या 13 आणि 14 डिसेंबर रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत.
![पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर, 339 कोटींच्या कामाचं करणार उद्घाटन PM Modi To Inaugurate Kashi Vishwanath Corridor tomorrow पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर, 339 कोटींच्या कामाचं करणार उद्घाटन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/6c576b00f50e96675fbe631951281856_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kashi Vishwanath Corridor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरचं सोमवारी लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी वाराणसी नगरी सजलीय. मोदींच्या स्वागतासाठी काशी विश्वनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. काशी विश्वनाथ कॉरिडोर लोकार्पणचा हा सोहळा जवळपास तीन तास चालणार आहे. या सोहळ्या दरम्यान आतषबाजी, लेजर शो आणि दीपोत्सवही पाहायला मिळणार आहे. ८ मार्च २०१९ रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वननाथ कॉरिडोरचं भूमीपूजन करण्यात आलं होतं...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात आधी काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करणार आहेत. काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींचे उद्घाटन करतील. सुमारे 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीशी जोडणारे सगळे मार्ग सहजतेने जोडण्याचे काम या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे. हा प्रकल्प आता सुमारे 5 लाख चौरस फूट एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पसरला आहे, तर पूर्वीची जागा फक्त 3000 चौरस फूट इतकी मर्यादित होती. कोविड महामारी असूनही, प्रकल्पाचे काम नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण झाले आहे. याची सुरुवात 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन करुन झाली होती.
या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर पंतप्रधान स्वतः देखरेख ठेवून होते, या प्रकल्पाविषयी, नियमितपणे माहिती, आढावा घेणे आणि देखरेखीचे काम त्यांनी वेळोवेळी केले. तसेच, कामाचा दर्जा वाढवण्यासाठी, प्रकल्पातील सुविधा सर्व भाविकांसाठी-अगदी दिव्यांगांसाठीही अधिकाधिक सहज साध्य होण्यासाठीच्या सूचना आणि सल्लेही त्यांनी वेळोवेळी दिले. या प्रकल्पाची संरचना अशा तऱ्हेची करण्यात आली आहे, जेणेकरुन, वृद्ध लोक आणि दिव्यांगांना इथे जाणे सुलभ होईल. त्यात रेंप, एस्केलेटर्स आणि इतर आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, 23 इमारतींचे उद्घाटन केले जाणार आहे. या अंतर्गत, काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यात, यात्री सुविधा केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, वैदीक केंद्र, मुमुक्षू भवन, भोगशाला, शहर वस्तूसंग्रहालय, पर्यटक गॅलरी, फूड कोर्ट अशा सुविधांचा समावेश आहे.
कसा आहे पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा?
वाराणसी दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कालभैरव मंदिराला भेट देतील आणि 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता रो-रो जहाजातून गंगा आरतीचे साक्षीदार होतील. 14 डिसेंबर रोजी, दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान वाराणसीतील स्वरवेद महामंदिर येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील.
अनेक मुख्यमंत्र्यांची उपस्थिती -
दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या परिषदेत सहभागी होणार आहेत. ही परिषद टीम इंडियाच्या भावनेला पुढे नेण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत प्रशासनाशी संबंधित सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याची संधी प्रदान करेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)