'द कश्मीर फाईल्स'प्रमाणे विभाजनाच्या वेदना, आणीबाणी आणि 'ऑपरेशन गंगा'वरही चित्रपट बनावेत: पंतप्रधान मोदी
The Kashmir Files : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या झुंडीं 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाला विरोध करत आहेत असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
नवी दिल्ली: जे सत्य अनेक वर्षे लोकांच्या समोर आणलं गेलं नव्हतं ते आता 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटाच्या माध्यमातून समोर आलं आहे, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे लोक हैराण झाले आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटाप्रमाणे देशाच्या विभाजनाच्या वेदना, आणीबाणीतील दु:ख आणि 'ऑपरेशन गंगा'वरही चित्रपट निर्माण करावेत असंही आवाहन त्यांनी केलं आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गप्पा मारणारे सैरवैर
'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटावरुन देशात वाद सुरू आहे, यावरून दोन गट पडले आहेत. या चित्रपटाचे कौतुक आता पंतप्रधानांनी केलं आहे. एखाद्या चित्रपटावरून पंतप्रधांनांनी वक्तव्य करावं ही विशेष बाब आहे. 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटातून काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना मांडण्यात आल्या आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जे लोक या चित्रपटातील तथ्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, या चित्रपटाला विरोध करत आहेत तो केविलवाणा आहे. जे लोक स्वत:ला उदारमतवादी म्हणतात त्यांनी एका कलाकृतीला विरोध का करावा? अशा प्रकारचे चित्रपट अजून निर्माण व्हावेत. अद्याप आणिबाणीवर एकही चित्रपट नाही, कारण सत्य दाबलं जातंय. देशाचं विभाजनावेळी अनेकांना वेदना सहन कराव्या लागल्या पण यावर एक चित्रपट नाही. पण आता कश्मीरमधील वेदनांवर चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. देशाच्या विभाजनाच्या वेदना, आणीबाणीतील दु:ख आणि 'ऑपरेशन गंगा'वरही चित्रपट बनवण्यात यावेत."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जे सत्य आहे त्याला सर्व स्वरुपातून देशाच्या समोर आणणं हे देशाच्या भल्यासाठी आहे. ज्यांना वाटतंय की हा चित्रपट चुकीचा आहे, त्यांनी यावर वेगळा चित्रपट निर्माण करावा. पण जे सत्य अनेक वर्षे लोकांच्या समोर आणलं गेलं नव्हतं ते आता या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आलं असल्यानं हे लोक हैराण झाले आहेत."
'ऑपरेशन गंगा'वर चित्रपट व्हावा
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर पडण्यासाठी रशियाने हल्ले थांबवले असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने जे ऑपरेशन राबवलं त्याला 'ऑपरेशन गंगा' असं नाव देण्यात आलं होतं. त्यामुळे 'द कश्मीर फाईल्स'नंतर आता 'ऑपरेशन गंगा'वरही चित्रपट व्हावा अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
गांधीवरील पहिला चित्रपट परदेशी व्यक्तीने केला
सगळं जग नेल्सन मंडेलांवर चर्चा करतं. पण स्वातंत्र्यानंतर जगासमोर महात्मा गांधींना आणलं ते एका परदेशी व्यक्तीने. त्यानंतर जगाला गांधी समजले, त्यांचं महत्व समजलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह -
ABP Majha