(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चार दिवशीय अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले, सोबत आणल्या 157 प्राचीन कलाकृती
पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवशीय अमेरिका दौऱ्यानंतर आता पुन्हा स्वदेशी आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यातून भारतात 157 प्राचीन कलाकृती आणि वस्तू घेऊन आले आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवशीय अमेरिका दौऱ्यानंतर आता पुन्हा स्वदेशी आले आहेत. पंतप्रधानांचे विमान दिल्लीच्या पालम विमानतळावर लॅंड झाले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा एअरपोर्टवर पोहोचले होते.
भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते विमानतळाबाहेर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाचताना, गाताना व घोषणाबाजी करताना दिसून आले होते. देशभरातील अनेक राज्यांमधून लोकं पारंपारिक वेषभूषेत पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दिल्लीला पोहोचले होते.
कोरोनाकाळत आशिया खंडाबाहेर पंतप्रधान पहिल्यांदाच गेले होते. जगभरात भारताची नवी ओळख निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित केलं. अमरिकेचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यासोबत
चर्चा केली. त्यासोबत जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना देखील भेटले. चार देशांच्या एकत्र होणाऱ्या बैठकीत देखील सहभागी झाले. या व्यतिरिक्त अमेरिकेतील विविध कंपन्यांच्या मुख्य सीईओंसोबत देखील त्यांनी चर्चा केली.
जगभरात भारताचा गौरव करणाऱ्या मोदींचे अभिनंदन - जेपी नड्डा
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेलेले भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, ' पंतप्रधानांनी जगभरात भारताचा गौरव केल्याने त्यांच्या जगभरातील चाहत्यांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेक मंडळी आले आहेत. कोरोनाच्या
प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच त्यांना अमेरिकेला जाण्याचा योग आला. अतिशय व्यस्त वेळापत्रकात त्यांनी हा दौरा पूर्ण केला आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात घेऊन आले 157 प्राचीन कलाकृती
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यातून भारतात 157 प्राचीन कलाकृती आणि वस्तू घेऊन आले आहेत. अमेरिकेने या सर्व कलाकृती मोदींना भेट म्हणून दिल्या आहेत. यातील काही कलाकृती तर 11 व्या शतकापासून 14 व्या शतकातल्या आहेत.
संयूक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात मोदिंनी पाकिस्तानवर साधला निशाणा
संयूक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात मोदिंनी पाकिस्तान आणि इम्रान खान यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. ते म्हणाले होते, जे देश दहशतवादाचा आधार घेत आहेत, त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, यामुळे त्यांनाही धोका आहे. तसेच अफगाणिस्तानचा वापर
आपल्या स्वार्थासाठी कुणी करु नये, असा इशाराही मोदींनी यावेळी दिला.