Coronavirus Update : किशोरवयीन मुलामुलींच्या लसीकरणाला गती देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश
Coronavirus Update : पंतप्रधान मोदी यांनी किशोरवयीन मुलामुलींसह, फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या लसीकरणाला गती देण्यास सांगितले आहे.
Coronavirus Update : पंतप्रधान मोदी यांनी (PM Narendra Modi) कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच किशोरवयीन मुलामुलींसह, फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या लसीकरणाला गती देण्यास सांगितले आहे. सोमवारपासून सुरू होणारी ही लसीकरण मोहीम 'मिशन मोड'वर पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. यामध्ये मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीला हजेरी लावली. देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरियंटमुळे देशाच्या काही भागांमध्ये संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया उपस्थित होते. या बैठकीत विमान वाहतूक सचिव, गृह सचिव, कॅबिनेट सचिव आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांचा समावेश होता.
रविवारी आढावा बैठकीदरम्यान, पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधांची खात्री करण्याचे आणि किशोरवयीन मुलांसाठी “मिशन मोड” मध्ये लसीकरण मोहिमेला गती देण्याचे निर्देश दिले. आरोग्य अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, देशात 15-18 वयोगटातील 31 टक्के किशोरवयीन मुलामुलींना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य-संबंधित मार्गदर्शनाची उपलब्धता वाढवण्यासाठी नॉन-कोविड आरोग्य सेवा आणि टेलीमेडिसिनचा लाभ घ्यावा याची खात्री करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले.
पंतप्रधान मोदींनी साथीच्या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य सेवा कर्मचार्यांनी दिलेल्या अथक सेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Booster Dose : आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांना 'बूस्टर'
- Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच; रविवारी 44 हजार 388 रुग्णांची नोंद
- Assembly Election 2022 : निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान मोदींचा फोटो हटवणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha