PM Modi : येणारं वर्ष बाजरी वर्ष! पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांनो तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा
येणारे नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Live) म्हणाले...
PM Modi Live Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Live) यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले असल्याची माहिती दिली. मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, चेन्नई येथील श्रीदेवी वर्दराजनजी यांनी मला एक स्मरणपत्र पाठवले आहे. त्यांनी मायगव्हवर लिहिले आहे की जेमतेम पाच महिन्यांमध्ये नव्या वर्षाचे आगमन होईल. येणारे नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. त्यांनी मला देशाचा बाजरीचा नकाशाही पाठवला आहे.'मन की बात' च्या पुढच्या भागात तुम्ही बाजरीवर चर्चा करू शकता का? असे त्यांनी मला विचारले आहे. संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताच्या या प्रस्तावाला 70 पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा मिळाला आहे, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जगभरात बाजरी या भरड धान्याबद्दल आकर्षण वाढते आहे. आज भरड धान्याबद्दल तुमच्याशी बोलताना, भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी मी करत असलेल्या एका प्रयत्नाबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे.आजकाल काही वर्षांपासून माझ्या प्रयत्न असतो की, जेव्हा कोणीही परदेशी पाहुणे भारतात येतात, राज्याचे प्रमुख भारतात येतात, तेव्हा भारतातील तृणधान्यापासून, भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ वाढण्यात यावेत, असंही ते म्हणाले.
परदेशी लोकं आपल्याकडील तृणधान्याबद्दल बरीच माहिती गोळा करतात
पंतप्रधानांनी सांगितलं की, परदेशी मान्यवरांना, हे पदार्थ खूप आवडतात आणि ते आपल्या भरड धान्याबद्दल, तृण धान्याबद्दल बरीच माहिती गोळा करण्याचा देखील प्रयत्न करतात.प्राचीन काळापासून तृणधान्य हे आपल्या शेतीचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहे. आपल्या वेदांमध्ये तृणधान्यांचा उल्लेख आहे आणि त्याचप्रमाणे पुराणनुरु आणि टोल कप्पियममध्ये ही त्यांचा उल्लेख आहे. तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात गेलात तर तिथल्या लोकांच्या जेवणात तुम्हाला तृणधान्यांचे विविध प्रकार नक्कीच पाहायला मिळतील. आपल्या संस्कृतीप्रमाणेच तृण धान्यांमध्येही खूप वैविध्य आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे, कंगणी, चेना, कोडो, कुटकी, कुट्टू, ही सर्व तृणधान्येच आहेत, असं मोदी म्हणाले.
भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश आहे. तृणधान्याचा हा उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारीही आम्हा भारतीयांच्या खांद्यावरच आहे. आपण सर्वांनी मिळून याला एक जनआंदोलन बनवायचे आहे आणि देशातील जनतेमध्ये तृणधान्याविषयी जागरूकता वाढवायची आहे. मित्रांनो, तृणधान्ये शेतकऱ्यांसाठी ही फायदेशीर आहेत. ही पिके खूप कमी वेळात तयार होतात, आणि त्याला जास्त पाणीसुद्धा लागत नाही.आपल्या लहान शेतकऱ्यांसाठी तर तृणधान्ये विशेष फायदेशीर आहेत. तृणधान्यांचा पेंढा देखील सर्वोत्तम चारा मानला जातो, असं ते म्हणाले.
तृणधान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
पंतप्रधानांनी म्हटलं की, आजकाल तरुण पिढी आरोग्यपूर्ण जीवन आणि अन्नाकडे खूप लक्ष देते. त्या दृष्टीने पाहिले तर तृणधान्यत भरपूर प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि खनिजे असतात. बरेच लोक तर याला सुपर फूड देखील म्हणतात. तृणधान्याने लठ्ठपणा कमी करण्यासोबतच ते मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा संबंधित आजारांचा धोकाही कमी करतात. यासोबतच ते पोट आणि यकृताच्या आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करतात. कुपोषणाबद्दल आपण काही काळापूर्वी बोललो होतो. तृणधान्ये कुपोषणाशी लढण्यासाठी देखील खूप उपयोगी आहेत, कारण ती ऊर्जा तसेच प्रथिनांनी परिपूर्ण आहेत.
तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा
आज देशभरात तृणधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही केले जात आहे. यासंबंधित संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपयोगांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच FPOs( शेतकरी उत्पादक संघा) ला प्रोत्साहन दिले जात आहे, जेणेकरून उत्पादन वाढवता येईल.आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा आणि त्याचा लाभ घ्या, असं आवाहनही मोदी यांनी केलं.