Mann Ki Baat LIVE : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे रंग केवळ भारतातच नाही तर जगभरात; पंतप्रधानांकडून कौतुक
PM Modi Live Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Live) यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं.
PM Modi Live Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Live) यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त झालेल्या देशभरातील कार्यक्रमाचं कौतुक केलं. पंतप्रधानांनी म्हटलं की, अमृत महोत्सवाचे हे रंग केवळ भारतातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृत महोत्सवानिमित्त लहान मुलांनी आणि युवा मित्रमंडळींनी अनेक सुंदर चित्रे आणि कलाकृती पाठवल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या महिन्यात आपल्या संपूर्ण देशभरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अमृत महोत्सवाची अमृत धारा बरसत आहे.
तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आली
पंतप्रधान म्हणाले की, आपला एवढा मोठा देश, एवढी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते. तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला. स्वच्छता मोहिम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन
पंतप्रधानांनी म्हटलं की, अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडले आहे. चैतन्याची अनुभूती आपण अनुभवली आहे. कृष्णील अनिल जीहे या युवा सहकारी, एक पझल आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी मोज़ॅक कलेच्या माध्यमातून विक्रमी वेळेत सुंदर तिरंगा तयार केला आहे. कर्नाटक मधील कोलार येथील लोकांनी 630 फूट लांब आणि 205 फूट रुंद तिरंगा हातात धरून एक अनोखा देखावा सादर केला.आसाममधील सरकारी कर्मचाऱ्यांनी दिघालीपुखुरी युद्ध स्मारकावर तिरंगा फडकवण्यासाठी स्वत:च्या हाताने 20 फुटांचा तिरंगा तयार केला. इंदूरमधील लोकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा तयार केला, तर चंदीगडमधल्या तरुणाईनी महाकाय मानवी तिरंगा साकारला. या दोन्ही विक्रमांची नोंद गिनीज रेकॉर्डमध्ये झाली आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
विदेशातही अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम
पंतप्रधानांनी म्हटलं की, बोत्सवाना येथे राहणाऱ्या स्थानिक गायकांनी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी देशभक्तीपर 75गाणी गायली. विशेष म्हणजे हिंदी, पंजाबी, गुजराती, बंगाली, आसामी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि संस्कृत या भाषांमध्ये ही 75 गाणी गायली गेली. नामिबियामध्ये भारत-नामिबिया यांच्यातील सांस्कृतिक-पारंपारिक संबंधांवर आधारित विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.