(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदींच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेचा शुभारंभ
नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ झाला आहे. सामान्य लोकांसाठी बँकेची सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ झाला आहे. सामान्य लोकांसाठी बँकेची सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवा भारतीय पोस्ट विभागाच्या अखत्यारीत असेल. दुसऱ्या बँकांसारखीच याची सेवा ग्राहकांना मिळणार आहे. मात्र याद्वारे क्रेडिट कार्ड आणि अॅडव्हान्स लोनची सुविधा उपलब्ध नसेल.
एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ग्राहक यात जमा करु शकतात. याद्वारे एटीएमची सुविधाही दिली जाणार आहे. आजपासून देशभरातील 650 शाखा आणि 3 हजार 250 सुविधा केंद्रात याचं काम सुरु होईल.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भारत सरकारची 100 टक्के भागिदारी असणार आहे. आपल्या खातेधारकांना एटीएम, करंट अकाउंट, मनी ट्रान्सफर, डायरेक्ट मनी ट्रान्सफर, बिल पेमेंट यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. या सेवेमुळे पोस्ट विभाकाचं नेटवर्क आणि तीन लाखांहून अधिक पोस्टमन आणि ग्रामीण पोस्ट सेवकांना लाभ मिळणार आहे.