PM Modi In BRICS : जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी आपण एक प्रभावी आवाज : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पारंपरिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबरोबरच आपण ब्रिक्स अजेंडा आणखी विस्तृत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या संदर्भात, ब्रिक्सने अनेक गोष्टी पहिल्यांदाच केल्या आहेत.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी ब्रिक्सचे 13 वे शिखर संमेलन पार पडले. ब्रिक्स मंचाने गेल्या दीड दशकांत अनेक कामगिरी केल्या आहेत. आज आपण जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज आहोत.हा मंच विकसनशील देशांच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरल्याचे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ब्रिक्सने नवीन विकास बँक, आकस्मिकता राखीव व्यवस्था आणि ऊर्जा संशोधन सहकार्य व्यासपीठ यांसारख्या सामर्थ्यशाली संस्था तयार केल्या आहेत.आपल्याला अभिमान वाटेल असे बरेच काही आहे, यात काही शंका नाही.मात्र ,आपण जास्त आत्मसंतुष्ट होऊ नये आणि आगामी 15 वर्षांत ब्रिक्स आणखी अधिक परीणामाभिमुख राहील हे सुनिश्चित करणे हे देखील महत्त्वाचे आहे.
या वर्षी, कोविडने निर्माण केलेली आव्हाने असतानासुद्धा 150 हून अधिक ब्रिक्स बैठका आणि कार्यक्रम आयोजित केले गेले. त्यापैकी 20 पेक्षा जास्त मंत्री स्तरावरचे होते. पारंपरिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबरोबरच आपण ब्रिक्स अजेंडा आणखी विस्तृत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या संदर्भात, ब्रिक्सने अनेक गोष्टी पहिल्यांदाच केल्या आहेत. अलीकडेच पहिली ब्रिक्स डिजिटल शिखर परिषद झाली. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्याची व्याप्ती वाढवण्यासाठी हे एक अभिनव पाऊल आहे.नोव्हेंबरमध्ये आपले जलसंपदा मंत्री ब्रिक्सच्या स्वरूपात पहिल्यांदा बैठक घेणार आहेत. 'बहुपक्षीय प्रणालींचे बळकटीकरण आणि सुधारणा ' या विषयावर ब्रीक्समध्ये सामूहिक भूमिका घेतल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ब्रिक्स दहशतवादाविरोधातील कृती आराखडा देखील स्वीकारला आहे.आपल्या अंतराळ संस्थांमधील रिमोट सेन्सिंग उपग्रह संरचना संदर्भातील करारामुळे सहकार्याचा एक नवीन अध्याय सुरू झाल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
