Santosh Deshmukh Murder in beed: कोर्टात न्यायाधीशांसमोर संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडीओ लावले, पत्नी अन् भावाला भयंकर दृश्य पाहून रडू कोसळलं
Beed crime news: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची विधानसभा निवडणुकीनंतर भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण राज्यभरात गाजले होते.

Beed crime news: संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाची शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरकारी पक्षाने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची कशाप्रकारे निर्घृणपणे हत्या केली, याचे पुरावे न्यायाधीशांसमोर सादर केले. यावेळी संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले, विष्णू चाटे (Vishnu Chate) आणि त्याच्या साथीदारांनी कशा पद्धतीने मारले, याचे व्हिडीओ न्यायालयात (High court) दाखवण्यात आले. सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या तोंडात लघवी केली होती. या सगळ्याचे व्हिडीओ उच्च न्यायालयात दाखवण्यात आले. ही सुनावणी सुरु असताना संतोष देशमुख यांची पत्नी आणि भाऊ धनंजय देशमुख हेदेखील न्यायालयात होते. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे हे व्हिडीओ पाहून या दोघांना रडू कोसळले.
Santosh Deshmukh Murder in beed: संतोष देशमुख हत्याप्रकरणात नेमका काय युक्तिवाद झाला?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकिलांनी केला. हत्याकांडाशी संबंध नसून गोवण्यात आल्याचा युक्तिवाद करत वाल्मिक कराडच्यावतीने (Walmik Karad) खंडपीठात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची उर्वरीत सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शहा निवाड्यानुसार आरोपीला अटकेची कारणे लेखी देणे बंधनकारक असताना वाल्मिक कराडला कारणे दिलेली नाही, मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावला गेला आहे आणि देशमुख हत्याकांडात कराडचा संबंध नसून तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर होता. त्याला प्रकरणात गोवल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. त्यावर ॲड. अमरजितसिंह गिरासे यांनी प्रत्येक तारखेनुसार घटनाक्रम तपशीलवार उलगडून दाखवला. या घटनेतील साक्षीदार, मोबाईल फोन संवादाच्या तपशीलाचा (सीडीआर) अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ध्वनिफित मुद्रण, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयात दाखविण्यात आला. या सगळ्या पुराव्यांवरुन वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद गिरासे यांनी केला.
वाल्मिक कराड याने आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यासह सुदर्शन घुलेचे कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणे, आदी घटनाक्रम सरकारी वकिलांनी विस्तृतपणे मांडला. सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणानंतर वाल्मिक कराड याने आपल्या मागणीच्या आड येणाऱ्या देशमुखला आडवा करा, असा आदेश दिला. त्यानुसार सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उमरी टोलनाक्यावरुन संतोष देशमुख यांचे अपहरण केले. त्यांना निर्जन जागी नेऊन नृशंस मारहाण केली. ही मारहाण सुरु असताना वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर बोलणे सुरू होते. वाल्मिक कराड हाच मारेकऱ्यांना निर्देश देत होता, अशी बाजू गिरासे यांनी मांडली.
आणखी वाचा
























