पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त तीन आठवडयांचा जंगी कार्यक्रम भाजपकडून तयार
17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींचा 71 वा वाढदिवस आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून भाजप दरवर्षी हा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करत आहे.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारबद्दल तयार झालेल्या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताचं साधत त्यासाठी एक जंगी कार्यक्रमही आखला गेला आहे. अर्थात यानिमित्तानं पुढच्या सहा महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांचीही तयारी डोळ्यासमोर दिसतेय.
मोदींची प्रतिमा असलेल्या 14 कोटी रेशन बॅग, थँक यू मोदीजी असा संदेश असलेल्या 5 कोटी पोस्टकार्डचं वाटप आणि देशात 71 ठिकाणी नदी स्वच्छतेचे कार्यक्रम राबवण्यात आले आहे. त्यासोबतच देशात लसीकरण योग्य गतीनं असल्याचा दावा करणारं हाय व्होल्टेज सोशल मीडिया अभियान ही सगळी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपनं आखलेल्या अभियानाची जंगी तयारी आहे.
17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींचा 71 वा वाढदिवस आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून भाजप दरवर्षी हा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करत होतं. पण यावेळी आणखी एक वेगळं निमित्त आहे. 7 ऑक्टोबरला त्यांच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून राजकीय कारकीर्दीला सलग 20 वर्षे पूर्ण होतील. 7 ऑक्टोबर 2001 मध्ये त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारली होती. याच दोन्ही कारणांमुळे यावेळचा कार्यक्रम हा तीन आठवड्यांचा असणार आहे.
काय आहे मोदींच्या वाढदिवसानिमित्त अभियान?
- मोदींची प्रतिमा असलेल्या 14 कोटी रेशन धान्याच्या बॅग पोचवण्याचं उद्दिष्ट
- धन्यवाद मोदीजी हा संदेश देणारे पोस्टकार्डही लाभार्थींना वाटणार
- कोरोनाच्या काळात गरीबांसाठी योजना राबवल्या म्हणून गरिबों का मसीहा मोदी जी ही हैं असा संदेश असलेले व्हिडिओ अभियान राबवणार
- मोदींचा हा 71 वा वाढदिवस, त्यामुळे देशात 71 ठिकाणी नदी स्वच्छतेचे कार्यक्रम
- मोदींच्या आजवरच्या कारकीर्दीवर कला, साहित्य, क्रीडा या क्षेत्रातल्या लोकांना एकत्रित करुन सेमिनार घेण्याचा संकल्प
17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात हे अभियान चालणार आहे. त्यासाठी भाजपनं देशभरातल्या भाजप कार्यकर्त्यांसाठी हा जनसंपर्काचा कार्यक्रम आखला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारबद्दलची नकारात्मकता वाढली होती. सध्या महागाईचाही आगडोंब उसळला आहे. पेट्रोल डिझेलचे दर शंभरी गाठले आहेत. घरगुती सिलेंडर नऊशे रुपयांपर्यत पोहचला आहे. अशा वेळी पुढच्या सहा महिन्यांत यूपीसह पाच महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे भाजपनं ही वाढदिवसाची संधी साधल्याचं दिसत आहे.