(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol Diesel Price Today : आज पुन्हा कडाडले पेट्रोल-डिझेलचे दर; मुंबईत पेट्रोल 112, तर डिझेल 102 पार
Petrol Diesel Price Today 20 October 2021 : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 112.11 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेलही 102.89 रुपयांनी विकलं जात आहे.
Petrol Diesel Price Today 20 October 2021 : देशात सलग पेट्रोल आणि डिझेलचे दरांमध्ये सातत्यानं होणारी वाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. भारतीय तेल वितरण कंपन्यांनी मंगळवारी 20 ऑक्टोबर 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 0.35 पैशांची वाढ झाली आहे. देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोल 106.19 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. तर या दरवाढीनंतर डिझेलचे दर 94.92 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 112.11 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेलही 102.89 रुपयांनी विकलं जात आहे. मुंबईत डिझेलच्या दरांमध्ये 0.37 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या दरांमध्ये 0.34 पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 103.01 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.43 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
आठवडाभरात कितीनं महागलं पेट्रोल-डिझेल?
गेल्या आठवड्यात पेट्रोलच्या दरांत (Petrol Price) 1.70 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलची किंमत (Diesel Price) 1.75 रुपये प्रति लिटरनं वाढली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट कच्चं तेल 84.8 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. ब्रेंट कच्चं तेल सात वर्षांनी पहिल्यांदाच एवढं महाग झालं आहे.
देशातील प्रमुख महानगरांतील दर :
देशातील महत्त्वाची शहरं | पेट्रोल रुपये/लिटर | डिझेल रुपये/लिटर |
दिल्ली | 106.19 | 94.92 |
मुंबई | 112.11 | 102.89 |
कोलकाता | 106.77 | 98.03 |
चेन्नई | 103.31 | 99.26 |
पेट्रोल-डिझेलच्या दरांत का होतेय सातत्यानं वाढ?
जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे.
देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलनं ओलांडली शंभरी
देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत.
पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?
केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का? यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं...
पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).