Petrol Diesel: पुढच्या आठवड्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार? कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढ
Petrol Diesel Price Hike: रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होऊन ती 110 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्याचं दिसून येतंय.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर, म्हणजे 7 मार्च नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीने 110 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. त्याचा परिणाम देशातील इंधनावर होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये 9 ते 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे. क्रूड ऑइल उत्पादक देशांमध्ये रशिया हा प्रमुख देश आहे. युरोपच्या एकूण मागणीपैकी एकूण 35 टक्के पुरवठा हा रशियाकडून होतो. भारतालादेखील रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. युद्धाचा परिणाम हा या सप्लाय चेनवर होणार असून आगामी काही दिवसात दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.
2014 नंतर पहिल्यांदा विक्रमी किंमत
कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये 2014 नंतर पहिल्यांदाच विक्रमी वाढ झाली असून ही किंमत 110 डॉलर प्रति बॅरेल इतकी झाली आहे.
निवडणुकीचा परिणाम
देशात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 7 मार्च रोजी होणार असून पाच राज्यांच्या मतमोजणीचा निकाल 10 मार्चला जाहीर करण्यात येणार आहे. या पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. आता निकालानंतर यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Russia-Ukraine War : युद्धाचे परिणाम आता घराघरात, तेलाच्या किमतींत 20 ते 25 रुपयांनी वाढ
- Crude Oil Price : महागाईच्या संकटाची चाहूल; कच्च्या तेलाच्या दराने मोडला सात वर्षातील उच्चांक
- Petrol-Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा उच्चांक, देशात दर काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha