(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Pakistan : 'स्वत:चं अपयश लपवण्यासाठी पाकिस्तानचं भारताविरुद्ध षडयंत्र', अहवालात उघड
Pakistani Propaganda : पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा निर्णय भारताने सर्वस्वी पाकिस्तानवर सोडला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानला त्यांच्या भूमीवरून दहशतवाद पसरवणं थांबवावं लागेल.
MEA Report On Pakistan : पाकिस्तान दहशतवादाला (Terrorism) खतपाणी घालतो आणि स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधी वक्तव्य करतो, हे परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात उघड झालं आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात आहे. सध्या पाकिस्तानमध्ये भीषण आर्थिक संकट आहे. पाकिस्तानच्या जनतेचे दोन वेळेच्या जेवणासाठी हाल होत आहेत. अन्न मिळवण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. असं असताना आपल्या देशातील परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पाकिस्तान भारताचा अपप्रचार करणं मात्र सोडत नाहीय.
'स्वत:चं अपयश लपवण्यासाठी पाकिस्तानचं भारताविरुद्ध षडयंत्र'
पाकिस्तान सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या वाईट परिस्थितीतून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पाकिस्तानने मोठं षडयंत्र रचलं आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी पाकिस्तान आता भारताविरुद्ध अपप्रचार करण्यात गुंतला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
'भारताची बदनामी करणं हा पाकिस्तानचा उद्देश'
परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सोमवारी (13 मार्च) जारी केलेल्या अहवालात मंत्रालयानं म्हटलं आहे की, पाकिस्तानने आपल्या देशांतर्गत राजकीय आणि आर्थिक अपयश यावरुन ध्यान हटवण्यासाठी भारताविरुद्ध शत्रुत्व आणि अपप्रचार करण्याचा कट रचला आहे. भारताची बदनामी करणं हा पाकिस्तानचा उद्देश आहे. दहशतवादावर पाकिस्तानला झापताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणं मात्र सोडत नाहीय, दिवसेंदिवस यात वाढ होत आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने 13 मार्च रोजी वार्षिक अहवाल 2021-22 जारी केला आहे. यामध्ये मंत्रालयाने भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख केला आहे. पाकिस्तानकडील दहशतवादामध्ये कोणतीही घट झाली नसल्याचं अहवालात सांगितलं आहे. यासोबतच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याबाबत पाकिस्ताननं आतापर्यंत कोणतंही गांभीर्य दाखवले नाही. अद्यापही पाकिस्तान हे आरोप फेटाळून दहशतवाद्यांना पाठिशी घालत आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
'पाकिस्तान भारताचा बनावट प्रचार करण्यात गुंतलाय'
परराष्ट्र मंत्रालयाने 2022 च्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे की, पाकिस्तान भारताची बदनामी करण्यासाठी आणि आपल्या देशांतर्गत राजकीय आणि आर्थिक अपयशापासून लक्ष हटवण्यासाठी शत्रुत्वाचा आणि बनावट प्रचार करण्यात गुंतला आहे. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर भारताने पाकिस्तानची सर्व वक्तव्ये पूर्णपणे फेटाळून लावत वेळोवेळी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याशी संबंधित बाबी या देशाच्या अंतर्गत आहेत, हे मंत्रालयाने यावेळी अधोरेखित केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :