Oxfam Report: भारतातल्या एक टक्के श्रीमंतांकडे 40 टक्के संपत्ती, कोरोनाकाळात अब्जाधिशांच्या संपत्तीत 121 टक्क्यांनी वाढ
देशातील पाच टक्के लोकांकडे 62 टक्के संपत्ती असून खालच्या 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती असल्याचं ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या (Oxfam International) अहवालात म्हटलं आहे.
मुंबई: देशातील गरीब आणि श्रीमंतांच्या संपत्तीतील दरी अधिक वाढत असून एक टक्के श्रीमंतांकडे देशातील 40 टक्क्यांहून अधिक संपत्ती एकवटली असल्याचं ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या (Oxfam International) अहवालात म्हटलं आहे. देशातील 21 अब्जाधीश उद्योगपतींकडे असणारी संपत्ती ही 70 कोटी लोकांकडे असणाऱ्या संपत्तीपेक्षा जास्त असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. सन 2018 सालच्या अहवालात हे प्रमाण 73 टक्के इतकं होतं. आता त्यामध्ये घट झाल्याचं स्पष्ट आहे.
देशातील 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यावरून देशातील संपत्तीच्या विभाजनाची विषमता किती आहे याचं चित्र स्पष्ट होतंय. देशातील टॉप टेन श्रीमंतांवर केवळ पाच टक्के कर लावल्यास सर्व मुलांच्या शिक्षणाचा आणि कुपोषणाचा प्रश्न सुटेल असंही या अहवालात म्हटलं गेलं आहे.
कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर अनेक भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या, अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे या काळात अनेकांनी सेव्हिंग करण्यावर भर दिला असं या अहवालात म्हटलं आहे. याच काळात गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत भारतीय अब्जाधिशांच्या संपत्तीत 121 टक्क्यांची वाढ झाली असल्याचं हा अहवाल सांगतोय. म्हणजे कोरोना काळात भारतीय अब्जाधिशांच्या संपत्तीत दररोज 3 हजार 608 कोटी रुपये वाढ झाली.
भारतातील पाच टक्के लोकांकडे 62 टक्के संपत्ती
भारतातील पाच टक्के लोकांकडे 62 टक्के संपत्ती एकवटली असल्याचं हा अहवाल सांगतोय. तर खालच्या 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती आहे. भारतातील अब्जाधिशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. 2020 साली भारतात अब्जाधिशांची संख्या ही 102 इतकी होती. 2022 साली यामध्ये वाढ होऊन ती संख्या 166 वर पोहोचली.
देशातील टॉपच्या शंभर श्रीमंत लोकांकडे 660 अब्ज डॉलर म्हणजे 54 लाख 12 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीतून संपूर्ण देशाचं 18 महिन्यांचं बजेट चालू शकतं असं या अहवालात म्हटलं आहे.
पाच वर्षात प्रमाण 30 टक्क्यांनी घटलं
ऑक्सफॅमच्या 2018 सालच्या अहवालात म्हटलं होतं की, देशातील एक टक्के लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे. आताच्या ताज्या अहवालात हे प्रमाण 40 टक्क्यांवर घसरलं आहे.
ही बातमी वाचा: