Onion News: कांद्याचा बफर स्टॉक केंद्रानं दोन लाख टनांनी वाढवला, 25 रुपये किलो दराने कांदा विकणार NCCF
केंद्रशासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये NCCF मार्फत कांदा विकण्यात येणार आहे. आजपर्यंत बफर स्टॉकमधून सुमारे चौदाशे टन कांदा बाजारपेठेत पाठवला आहे.
मुंबई : कांद्याबाबत (Onion) महत्त्वाची बातमी आहे. केंद्राने रविवारी कांद्याचा बफर स्टॉक तीन लाख टनांवरून पाच लाख टनांपर्यंत वाढवला आहे. NCCF मार्फत आजपासून 25 रुपये प्रति किलो दरानं कांदा विकण्यात येणार आहे. बफर स्टॉकमधून कांद्याची विल्हेवाट लावण्यास केंद्र सरकारनं सुरुवात केली आहे. जेथे किरकोळ किमती अखिल भारतीय सरासरीपेक्षा जास्त आहेत, अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये NCCF मार्फत कांदा विकण्यात येणार आहे. आजपर्यंत, बफरमधून सुमारे चौदाशे टन कांदा बाजारपेठेत पाठवले गेला आहे.
बफरमधून कांद्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात झाली आहे. जेथे किरकोळ किमती अखिल भारतीय सरासरीपेक्षा जास्त आहेत किंवा मागील महिन्याच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहेत अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांना लक्ष्य केले आहे. आजपर्यंत, बफरमधून सुमारे 1,400 टन कांदा बाजारपेठेत पाठवले गेला आहे. इतर एजन्सी आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा समावेश करून आगामी काळात कांद्याची किरकोळ विक्री योग्यरित्या वाढविली जाणार आहे
NCCF (National Cooperative Consumers Federation) ही ग्राहक सहकाराशी संबंधित सर्वोच्च संस्था आहे. 2002 च्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी कायद्यांतर्गत त्याची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे हा या संस्थेचा उद्देश आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद
केंद्र सरकारने कांद्याचं निर्यातशुल्क वाढवून तब्बल 40 टक्क्यांवर नेल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीत घट होणार आहे. यामुळे पुढील काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त होतेय. म्हणूनच केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या लालसगावमधील बैठकीत हा निर्णय झालाय. खरंतर कालपासूनच अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
सरकारचा निर्णय आम्हाला मान्य नाही, संघटनांची प्रतिक्रिया
कांद्यावरील निर्यातशुल्क 40 टक्के केल्याने नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय काल घेतला. पण या निर्णयात आम्हाच्याशी चर्चा केली नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष भारत दिघोळे यांनी घेतली आहे.
महागाईला आळा घालण्यासाठी निर्यात शुल्क वाढीचा निर्णय
टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. टोमॅटोनंतर कांद्याचे दर ही सामान्यांना रडवणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर देशातंर्गत महागाईला आळा घालण्यासाठी निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. या निर्यात शुल्काच्या वाढीनंतर कांद्याच्या भावात घसरण होण्यास मदत मिळणार आहे. बाजारात कांद्यांचे दर 30 ते 40 रुपये किलोच्या घरात आहेत. सरकारकडून काही दिवसांआधीच किंमती पाडण्यासाठी बफर स्टॉक बाजारात आणण्यात आला.
हे ही वाचा :
केंद्राच्या निर्णयाने केला शेतकऱ्यांचा वांदा; कांदा निर्यात मूल्य 40 टक्के केल्याने शेतकरी संतप्त, व्यापारी आणि शेतकऱ्यांनीही केला निर्णयाचा निषेध