भारतीयांनो जर्मनीमध्ये काम करा, जर्मन चान्सलर स्कोल्झ यांचं आवाहन; आता व्हिसाची प्रक्रिया सोपी
India Germany Visa: जर्मनीला जाण्यासाठी आवश्यक असणारी व्हिसाची किचकट प्रक्रिया आता सोपी होणार आहे. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
India Germany Visa: अनेक भारतीय उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. जगभरातील विविध देशांत जाऊन अनेकजण विविध विषयांत शिक्षण घेत असतात. अशातच भारतातून जर्मनीला शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. शिक्षणासाठी किंवा कामाधंद्यासाठी जर्मनीला जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. भारत दौऱ्यावर आलेले जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ (Olaf Scholz) यांनी जर्मनीला भारतासोबत चांगले संबंध निर्माण करायचे आहेत, असं म्हटलं आहे. तसेच, भारतीयांना जर्मनीत जाण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठीही ते प्रयत्नशील असल्याचंही सांगितलं आहे. हे सांगताना त्यांनी जर्मनीला जाणाऱ्यांसाठी असलेली किचकट व्हिसाची प्रक्रिया आता आणखी सोपी करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
दरम्यान, सध्या जर्मनीमध्ये आयटी क्षेत्रात कुशल कामगारांची कमतरता आहे. आयटी क्षेत्राशी निगडीत तज्ज्ञांसाठी जर्मनीत भरपूर संधी आहेत. याच पार्श्वभूमीवर चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी व्हिसा संदर्भात घोषणा केली आहे.
जर्मनीचे चान्सलर स्कोल्झ भारत दौऱ्यावर
भारत दौऱ्यावर असलेल्या स्कोल्झ यांनी बंगळुरु येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "त्यांचं सरकार भारतातील आयटी व्यावसायिकांसाठी वर्क व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करु इच्छित आहे. जर्मनीला सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि कुशल आयटी कामगारांना आकर्षित करता यावं, यासाठी कायदेशीर चौकटीत सुधारणा करणं हे त्यांच्या सरकारचं यावर्षीचं प्राधान्य आहे. आम्हाला वर्क व्हिसा जारी करण्याची प्रक्रिया सुलभ करायची आहे. कायदेशीर प्रक्रियेव्यतिरिक्त, आम्हाला संपूर्ण प्रशासकीय प्रक्रियेचे आधुनिकीकरण करायचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
चान्सलर स्कोल्झ यांनी यावेळी बोलताना परदेशी कामगार कामासाठी जर्मनीला पोहोचल्यावर त्यांना भेडसावणाऱ्या भाषेच्या समस्येवरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, "यात कोणतीही अडचण येऊ नये. जेव्हा लोक जर्मनीमध्ये येतात, तेव्हा ते इंग्रजी बोलतात आणि नंतर हळूहळू जर्मन भाषा स्वीकारतात." दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या चान्सलर स्कोल्झ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्यासह मोठ्या कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली.
'ही' समस्या अजूनही 'या' देशांमध्ये कायम
आतापर्यंत व्हिसा मिळण्यास होणारा विलंब केवळ अमेरिका, जर्मनी, कॅनडा किंवा लंडनसाठीच नाही तर इतरही देशांना व्हिसा मिळण्यात अडचण होत आहे. यामध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, हंगेरी, आइसलँड, इटली, लॅटव्हिया, लिक्टेनस्टीन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आता 15 ते 18 महिने दीर्घकाळ व्हिसासाठी प्रतीक्षा करावी लागते. परदेशात जाणाऱ्यांसाठी व्हिसाची प्रक्रिया फार किचकट असते.