नितीश कुमार भाजपला झटका देणार?; माजी मंत्र्याने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विविध मुद्द्यांवर एकमत
झारखंडचे माजी मंत्री सरयू राय यांनी 5 वर्षांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला सोठचिठ्ठी दिली होती.
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकही (Election) यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 च्या अखेरीस होत आहे. त्यामुळे, तेथील प्रादेशिक पक्षही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, भारतीय जनतंत्र मोर्च (बीजेएम) चे प्रमुख आणि भाजपचे माजी नेते सरयू राय यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोठा दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ते झारखंडमध्ये (Jharkhand) नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड यांच्यासमवेत आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitishkumar) यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांना हे विधान केलं आहे. दरम्यान, सरयू राय यांनी नितीश कुमार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून नितीश कुमार भाजपल झटक देतील काय, अशीही चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. सरयू राय हे भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते होते, सध्या ते झारखंडमधील भारतीय जनतंत्र मोर्चाचे प्रमुख आहेत.
झारखंडचे माजी मंत्री सरयू राय यांनी 5 वर्षांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला सोठचिठ्ठी दिली होती. 2019 साली विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री रघुबर दास यांचा पराभव करत ते मोठे नेते म्हणून राजकारणात पुढे आले. त्यामुळे, जदयू (यु) सोबत त्यांच्या पक्षाची आघाडी झाल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जाईल. आगामी झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये आमच्या संभाव्य भूमिका आणि आघाडीसंदर्भात चर्चा झाली. झारखंड विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्यावरही सहमती झाली आहे. त्यामुळे, लवकरच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जदयु नेतृत्वाकडून निर्णय घेतला जाईल. काही मुद्दे आहेत, ज्यांना अंतिम स्वरुप देण्याची आवश्यकता आहे. आमच्यातील बैठकीनंतर मी समाधानी आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय होईल, असेही राय यांनी म्हटलं.
भेटीवर मंत्री चौधरी यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, नितीश कुमार यांचे निकटवर्तीय आणि मंत्री विजय कुमार चौधरी यांनीही याच अनुषंगाने मत व्यक्त केलं आहे. होय, राय यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा केली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकांच्या मुद्द्यावर विविध बाजूंनी चर्चा झाली. जेव्हा दोन नेते एकत्र येतात, तेव्हा राजकीय चर्चा आणि संवाद होत असतो. त्यातच, राय हे जेडीयु प्रमुख यांचे चांगले मित्र आहेत, असेही मंत्री चौधरी यांनी म्हटले.