एक्स्प्लोर
Advertisement
6 जनपथवर पवार-फडणवीस भेटीत नेमकं काय झालं?
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जेव्हा एनडीएच्या राष्ट्रपती उमेदवाराच्या अर्जाची धावपळ सुरु होती, त्याचवेळी महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाची घडामोड 6 जनपथ या पवारांच्या निवासस्थानी घडत होती.
एरव्ही तर दिल्लीकरांना पवार-मोदी भेटीची सवय आहे. मोदींचाच कित्ता गिरवत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवारांच्या भेटीला पोहचले. महाराष्ट्रातल्या कर्जमाफीची घोषणा झालेली असली, तरी निकषांवरुन घोळ सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज या बैठकीत चर्चा झाली.
या भेटीसाठी महाराष्ट्रातून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, जयंत पाटील, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील हे देखील खास दिल्लीत पोहचले होते. सकाळी नऊच्या सुमारास सुरु झालेली ही बैठक जवळपास तासभर चालली.
तासाभरानंतर चंद्रकांत दादा बैठकीतून बाहेर पडले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे निकष काय असावेत याबद्दल सरकारनं प्रस्ताव मांडला, पवारांनी काही सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं.
30 जून 2016 पर्यंतचे जे थकित शेतकरी आहेत, त्यांना 1 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी द्यायची असा सरकारचा विचार आहे. जवळपास 83 टक्के शेतकरी यात असतील असा सरकारचा दावा आहे. शिवाय जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात, त्यांनाही यात कसं समाविष्ट करता येईल यावरही सरकार विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
कर्जमाफीच्या प्रश्नावरची ही बैठक संपल्यानंतरही मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात जवळपास अर्धा ते पाऊण तास पुन्हा स्वतंत्र चर्चा सुरु होतीच. त्यामुळे या दुसऱ्या बैठकीत नेमकं काय झालं याचीही चर्चा सुरु आहे.
समृद्धी हायवेच्या प्रकरणात शरद पवारांनी कधी नव्हे ती विकासविरोधी भूमिका घेऊन सरकारची अडचण केली आहे. शिवाय मुख्यमंत्री आणि पवार यांची शेवटची थेट भेट मुंबईत त्या दिवशी झाली होती, ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी लवासाचा स्वतंत्र प्राधिकरणाचा दर्जा रद्द केला होता. त्यामुळे आजच्या बैठकीत दोघांमध्ये काय गुफ्तगू झालं याची उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री खरंतर एनडीएच्या राष्ट्रपती उमेदवाराचा अर्ज भरायला दिल्लीत आले होते. पण त्याआधी झालेली ही बैठक, या बैठकीचं ठिकाण आणि टायमिंगमुळे दिवसभर चर्चेत राहिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement