Project Cheetah : तब्बल 70 वर्षानंतर भारतात चित्ता दिसणार! नामिबियातून 8 चित्ते भारतात आणणार, जम्बोजेट सज्ज
Project Cheetah : तब्बल 70 वर्षांनी भारतात चित्त्याचं पुनरागमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी 17 सप्टेंबरला नामिबियावरुन 8 चित्त्यांची पहिली बॅच भारतात दाखल होणार आहे.
Project Cheetah : सध्या भारत सरकार 'प्रोजेक्ट चित्ता' (Project Cheetah) या विशेष मोहीमेत व्यस्त आहे. भारतातून नामशेष झालेला हा प्राणी पुन्हा आपल्या वातावरणात रुजावा, वाढावा यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे इंदिरा गांधींचं अधुरं राहिलेलं स्वप्नच मोदी पूर्ण करतायत असंही त्यामुळे म्हणता येईल. तब्बल 70 वर्षांनी भारतात चित्त्याचं पुनरागमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशीच. 17 सप्टेंबरला नामिबियावरुन 8 चित्त्यांची पहिली बॅच भारतात दाखल होतेय..आणि इतिहास पाहिला तर हे म्हणता येईल की देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं एक अधुरं स्वप्नच आता पंतप्रधान मोदी पूर्ण करतायत.
1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष
भारतातून 1952 मध्ये चित्ता नामशेष झाला. छत्तीसगढमध्ये शेवटच्या चित्याची शिकार झाली होती. त्यानंतर आशियात इराणमध्येच चित्त्याचं वास्तव्य होतं. 1970 मध्ये इंदिरा गांधींनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरु केली होती. आमचे काही वाघ तुम्हाला घ्या, त्या बदल्यात चित्ते आम्हाला द्या अशी ती ऑफर होती. इराणच्या शाहांशी इंदिरा गांधी यांनी करारावर सह्याही केल्या होत्या. पण इराणमध्ये वादळी सत्ताबदल झाला, शाहांची राजवट गेली नंतर हा प्रोजेक्ट बारगळलाच.
आफ्रिकेतून चित्ते आणण्याची परवानगी
त्यानंतर भारतात पुन्हा चित्ते आणण्यासाठीची हालचाल 2009 मध्ये सुरु झाली. यूपीए सरकारच्या काळात अनेक प्राणीमित्र, आंतरराष्ट्रीय संघटनांनी आफ्रिकेतून चित्ते आणता येतील का याबाबत हालचाली सुरु केल्या. मध्य प्रदेशचं कुनो नॅशनल पार्क, जैसलमेरचं शाहगड अशी काही ठिकाणंही निश्चित झाली. पण 2012 मध्ये सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीनं चित्ते भारतात आणायला मनाई केली. भारतातल्या वाघांच्या पुनर्वसनाचं काम सुरु असतानाच तिथे चित्ते येणार, आफ्रिकन चित्त्यांना हे हवामान मानवेल का अशी काळजी सुप्रीम कोर्टाला वाटली. पण सात वर्षानंतर 2020 मध्ये सुप्रीम कोर्टानं ही बंदी उठवली. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर आफ्रिकेतून चित्ते आणण्याची परवानगी भारताला मिळाली.
आफ्रिकेतून चित्त्यांचा प्रवास किती खास असणार ?
- नामिबियामधून सलग 16 तास प्रवास करु शकेल असं जंबोजेट यासाठी सज्ज आहे
- प्रवासात चित्त्यांना उलट्या होतात, त्यामुळे त्यांना कमी त्रास व्हावा यासाठी हा प्रवास रात्रीचा करण्यात येणार आहे
- प्रवासाआधी दोन तीन दिवस त्यांना काही खायला दिलं जात नाही, त्यामुळे प्रवास फार लांबू नये यासाठी इंधनासाठीही थांबायला लागू नये असं स्पेशल विमान सज्ज आहे
- दुबईतल्या एका खासगी संस्थेचं हे विमान भारतात आधी जयपूरमध्ये येईल
- तिथून नंतर हेलिकॉप्टरनं हे चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये रवाना केले जातील
- मध्य प्रदेशात या चित्त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी स्वत: उपस्थित असतील.
पाहा व्हिडीओ : 70 वर्षानंतर भारतात पाऊल ठेवणार चित्ता, मोदींच्या हस्ते गृहप्रवेश
भारतात आल्यानंतर या चित्त्यांची वाढ कशी होतेय हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे. जगात एकूण सात हजारच्या आसपास चित्ते आहेत. त्यापैकी तब्बल दोन तृतीयांश चित्ते हे एकट्या दक्षिण आफ्रिकेतच आढळतात. एकूण 16 चित्ते भारतात आणायचे आहेत, त्यापैकी 8 चित्य्यांची ही पहिली बॅच पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसांच्या दिवशी भारतात दाखल होणार आहे.
काही दिवसांपूर्वी भारतात वाघांची संख्या कमी होत चालली होती. त्यानंतर त्यासाठी विशेष अभियान हाती घेतलं गेलं. 2006 च्या दरम्यान 1411 वाघ देशात उरले होते. आता ही संख्या वाढून तीन हजारांच्या आसपास पोहचली आहे. आता 70 वर्षांपूर्वी नामशेष झालेला चित्ताही आपण पुन्हा भारतात आणतोय. चित्त्यांची संख्या वाढवण्यात आपण यशस्वी होतो का हेही पाहावं लागेल.