मणिपूरच्या नावातच मणी, हिंसाचारानंतर पहिल्यांदाच मणिपूरमधून बोलले PM मोदी; 3 नव्या रेल्वेमार्गाचे लोकार्पण
मणिपूरच्या नावातच मणी आहे, हा तो मणी आहे जो आगामी काळात उत्तर पूर्व भारताची चमक वाढवणार आहे. मणिपूर हे बॉर्डरला लागून असलेलं राज्य आहे, येथे दळणवळण नाही.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) आज शनिवारपासून तीन दिवस पाच राज्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामध्ये पहिल्याच दिवशी मोदींचा मणिपूर दौरा असून मणिपूरमधील अशांतता आणि जाळपोळीच्या घटनानंतर प्रथमच मोदी इथे आले आहेत. त्यामुळे, विकासकामांच्या मुद्द्यासह नेमकं काय बोलतील याकडे देशाचे लक्ष लागले होते. कारण, मणिपूर (Manipur) हिंसाचारानंतर विरोधकांकडून सातत्याने नरेंद्र मोदींनी मणिपूरला भेट द्यावी अशी मागणी केली जात होती. मात्र, मोदींनी घटनेच्या अनेक महिन्यांनंतर विकासकामांच्या निमित्ताने मणिपूरला भेट दिली. मणिपूरची भूमी ही धाडस आणि शौर्याची भूमी आहे, मी मणिपूरकरांच्या इच्छाशक्तीला सलाम करतो. मोठ्या पावसातही आपण सर्वजण इथे आलात, असे म्हणत मोदींनी मणिपूरवासीयांचे आभार मानले.
मणिपूरच्या नावातच मणी आहे, हा तो मणी आहे जो आगामी काळात उत्तर पूर्व भारताची चमक वाढवणार आहे. मणिपूर हे बॉर्डरला लागून असलेलं राज्य आहे, येथे दळणवळण नाही. त्यामुळे, तुम्हाला जी अडचण आहे, ती मी जाणतो. 2014 पासून मी या राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊन होतो. शहरांसह गावागावात रस्ते पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील होतो. आता, राज्यात 8768 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काम सुरू असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले. दरम्यान, प्रधानमंत्री मोदींच्याहस्ते आज चुराचांदपूर येथे 7,300 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमीपूजन होत आहे. त्यानंतर, मणिपूरसह मिझोराम, आसाम, प. बंगाल आणि बिहार या राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यात भेट देणार आहेत. राज्यातील मिझोराम येथून आयझोल-दिल्लीदरम्यान पहिल्या राजधानी एक्स्प्रेससह इतर नव्या रेल्वेंना पंतप्रधान मोदींनी आज हिरवी झेंडी दाखवली. त्यामुळे, नॉर्थ इस्टमधील हे तीन राज्य आता थेट दिल्लीशी जोडले गेले आहेत.
प. बंगाल अन् बिहार दौरा (bihar and west bengal)
सायंकाळनंतर 14 सप्टेंबरपर्यंत मोदी आसाम दौऱ्यात भारतरत्न भूपेन हजारिका जन्मशताब्दी महोत्सवात सहभागी होतील. त्यानंतर, प. बंगालमध्ये 15 सप्टेंबरला कोलकात्यात संयुक्त कमांडर संमेलनाचे उद्घाटन करतील, तर बिहारमधील पूर्णिया येथे राष्ट्रीय मखाना महामंडळाचे उद्घाटन मोदी करतील.
मणिपूर दौऱ्यावरुन विरोधकांची टीका (Rahul gandhi)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरुन काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलीय. मोदींचा मणिपूर दौरा चागंली गोष्ट आहे, पण खरा मुद्दा मत चोरीचा आहे, असे राहुल गांधींनी म्हटले. तर, मोदींचा मणिपूर दौरा प्रतिकात्मकता आणि अपमान असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे. तसेच, मोदींनी अगोदरच मणिूपरला जायला हवं होतं, असे प्रियंका गांधी यांनी म्हटलं.
हेही वाचा
2.27 मिनिटांचा Video, अमित ठाकरेंचं नाव घेतलं, पण राज ठाकरेंचं नाही; प्रकाश महाजन काय काय म्हणाले?

























