Prakash Mahajan Resignation: 2.27 मिनिटांचा Video, अमित ठाकरेंचं नाव घेतलं, पण राज ठाकरेंचं नाही; प्रकाश महाजन काय काय म्हणाले?
Prakash Mahajan Resignation: मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. माझा केवळ निवडणुकीत वापर केला, अशी खंत प्रकाश महाजन यांनी बोलावून दाखवली.

Prakash Mahajan Resignation: मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan MNS Resignation) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना दिलेलं आव्हान प्रकाश महाजन यांना भोवल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. माझा केवळ निवडणुकीत वापर केला, अशी खंत प्रकाश महाजन यांनी बोलावून दाखवली. दरम्यान, राजीनामा देताना प्रकाश महाजन यांनी साधारण 2.27 मिनिटांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओमध्ये प्रकाश महाजन मनातलं सगळं बोलताना पाहायला मिळाले. महत्वाचं म्हणजे 2.27 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये प्रकाश महाजन यांनी मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचं नाव घेतलं, परंतु मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं एकदाही नाव घेतलं नाही.
प्रकाश महाजन काय काय म्हणाले?
मी प्रकाश महाजन माझा राजकीय परिचय आपणास दिला पाहिजे असं नाही. आज मी तुमच्यासमोर या गोष्टीसाठी आलो आहे कुठेतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसांपासून माझ्या मनात सारखी येत आहे. खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्याच वेळी थांबायला पाहिजे होतं. खरं म्हणजे पहेलगामच्या वेळी मी थांबायला पाहिजे होतं. पण त्यावेळी मला असं वाटलं की कुठेतरी काहीतरी सुधारणा होईल. व्यक्तिगत म्हणाल तर माझ्यापेक्षा अत्यंत कमी आहे. कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला निवडणुकीचा तिकीट मिळण्याची गरज नव्हती. कुठल्या पदाची गरज नव्हती. फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती. परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत कधी मला विचारण्यात आलं नाही, विधानसभेच्या वेळी प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं. जी जी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली ती मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली, असं प्रकाश महाजन म्हणाले.
मी अमित ठाकरेंना शब्द दिला होता- प्रकाश महाजन
माझ्या कामाचं कौतुक नाही, मग माझ्या हातून जा चुका झाल्याच नाहीत त्याचे बोल मला लावण्यात आले. जे पाप माझ्याकडून घडले नाही, त्याचे प्रायचित्त मला देण्यात आले. खरं म्हणजे मी फक्त अमित ठाकरे यांचा थोडा अपराधी आहे. मी अमित ठाकरेंना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता, अमितजी मी तुमच्यासोबत आणि तुमच्या मुलासोबत देखील काम करेल. पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली. मी दिलेला शब्द पाळू शकत नाही. अमितजी तुम्ही मला समजून घ्याल असं वाटतंय. कधी कधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्य ते त्याला मिळत नाही. हा नशिबाचा मी एक भाग समजतो. असंख्य मनसैनिकांनी माझ्यावरती मनापासून प्रेम केलं. वेळोवेळी ते सर्वर्थाने माझ्यासाठी धावून आले. त्या सर्व मनसैनिकांचा मी कायमचा ऋणी राहील. पण मला असं वाटतं की आता आपण थांबलं पाहिजे. कुठेतरी या मनोरुग्न अवस्थेतून बाहेर आले पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला आहे, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
प्रकाश महाजनांनी राणेंना आव्हान दिल्यानंतर काय घडलेलं?
प्रकाश महाजन यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत केलेलं भाष्य आणि त्यांचा मीडियातील वावर यावरुन त्यांना साईडलाईन केल्याची चर्चा रंगली होती. याबाबत 15 जुलै 2025 रोजी प्रकाश महाजन यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला होते. यावेळी प्रकाश महाजनांनी पक्षात एकटं पडल्याची भावना अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली होती. भाजप खासदार नारायण राणे यांच्यासोबत टीका टीपण्णी झाली त्यावेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला केला. पण मनसेतील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना जाहीर माझी बाजू घेतली नाही. मी नाराज नाही खिन्न आणि दुःखी आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले होते. प्रकाश महाजनांच्या या नाराजीनंतर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतले होते. यावेळी अमित ठाकरेंनी प्रकाश महाजनांची समजूत देखील काढली होती. मात्र यादरम्यान प्रकाश महाजन शिवतीर्थावर येऊन देखील राज ठाकरे त्यांना भेटले नव्हते.

























