तीच पुनरावृत्ती! हैदराबादमध्ये श्रद्धासारखं हत्याकांड; लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रेमिकेची हत्या
Hyderabad Murder Case: हैदराबादमध्ये दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Hyderabad Murder Case: दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची (Murder Case) पुनरावृत्ती हैदराबादमध्ये झाली आहे. हैदराबादमध्ये एका व्यक्तीनं लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रेमिकेची हत्या केली आहे. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या हत्याकांडाचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्यांच्या प्रेयसीचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले आणि दुर्गंधी न येण्यासाठी किटननाशके आणि इतर सुगंधी द्रव्य आणि परफ्युमचा छिडकाव केला.
नेमकं काय आहे प्रकरण?
हैदराबाद पोलिसांच्या माहितीनुसार, 17 मे रोजी पोलिसांना शहराच्या मुसी नदीजवळ मानवी शरीरीच्या काही भागांचे तुकडे आढळून आल्याची माहिती मिळाली. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा पोलिसांना आश्चर्यकारक माहिती मिळाली. आरोपी चंद्र मोहन (वयवर्ष 48) याचे कृतिका यारम अनुराधा रेड्डी (55 वर्षीय) हिच्याशी गेल्या 15 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आपल्या पतीपासून विभक्त होऊन कृतिका चंद्र मोहन याच्यासोबत हैदराबाद येथील दिलसुखनगर येथील चैतन्यपुरी कॉलनीतील त्याच्या घरामध्ये राहत होती.
कृतिका 2018 पासून पैसे व्याजावर देण्याचं काम करत होती. आरोपीनं देखील ऑनलाईन व्यापार करण्यासाठी या महिलेकडून जवळपास सात लाख रुपये उधार घेतले. त्यानंतर या पैशांमुळे दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. पैशांसाठी त्या महिलेवर दबाब निर्माण करण्यासाठी तो तिला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. 12 मे रोजी आरोपीनं त्याच्या घरात त्या महिलेसोबत भांडण केलं आणि तिच्यावर चाकूनं हल्ला केला. त्या हल्लामध्ये तिचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही कॅमेरामधून मिळाली माहिती
हत्या झाल्यानंतर आरोपीनं शरीराचे तुकडे करण्यासाठी दगड कापण्याची मशीन विकत घेतली. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे पॉलिथिन बॅगमध्ये भरले. त्यांनंतर तिचे पाय आणि हात वेगळे करुन त्यांना फ्रिजमध्ये ठेवले. 15 मे रोजी त्यांने तिचे धड मुसी नदीजवळ फेकून दिले. त्यानंतर आजबाजूला दुर्गंधी पसरू नये म्हणून आरोपीनं फिनेल, डेटॉल, अत्तर, अगरबत्ती आणि कापूर खरेदी करुन त्यांचा छिडकाव महिलेच्या मृतदेहाच्या तुकड्यांवर नियमितपणे करु लागला. त्यानं ऑनलाईन शरीराची विल्हेवाट कशी लावायची याचे व्हिडीओ देखील पाहिले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या मोबाईलवरुन तिच्या ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवत होता, जेणेकरुन कोणालाही कसलाही संशय येणार नाही. 17 मे रोजी मुसी नदीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ सफाई कर्मचाऱ्यांना महिलेचं शीर आढळून आलं. कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांना तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि ता तक्रार नोंदवण्यात आली.
सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून घेतली. त्यांनंतर आरोपीकडून गुन्हा कबूल करुन घेतला. महिलेच्या शरीराचे इतर भाग आरोपीच्या घरातून जप्त केले. पोलीस उपायुक्त, रुपेश चेन्नुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजारात ऑनलाईन ट्रेडिंग करणाऱ्या बी चंद्र मोहन याला पोलिसांनी अटक केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Satyendar Jain : सत्येंद्र जैन पुन्हा रुग्णालयात दाखल, तिहार जेलच्या बाथरुममध्ये चक्कर येऊन पडले!