एक्स्प्लोर
शहीद जवान औरंगजेब यांचे दोन्ही भाऊ सैन्यात भरती, पंजाब रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण
औरंगजेब शहीद झाल्यानंतर एका वर्षाने त्यांच्या दोन्ही भावांनी सैन्यदलात भरती होत आपल्या भावाला अनोखी मानवंदना दिली आहे.
श्रीनगर : काश्मीरच्या शोपियामधून आपल्या घरी ईद साजरी करण्यासाठी जात असताना दहशतवाद्यांकडून लक्ष्य झालेल्या शहीद जवान औरंगजेबचे दोन्ही भाऊ सैन्यात भरती झाले आहेत. औरंगजेब शहीद झाल्यानंतर एका वर्षाने त्यांच्या दोन्ही भावांनी सैन्यदलात भरती होत आपल्या भावाला अनोखी मानवंदना दिली आहे. औरंगजेब यांचे वडिल मोहम्मद हनीफ यांनीही सैन्यात सेवा बजावली आहे.
शहीद रायफलमॅन औरंगजेब यांचे दोन्ही छोटे भाऊ मोहम्मद तारिक आणि मोहम्मद शब्बीर सैन्यदलात भरती झाल्याची माहिती सैन्याच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. औरंगजेब यांच्या दोन्ही भावांनी सैन्यात भरती होण्याची तयारी फार आधीच सुरु केली होती. जवान औरंगजेब शहीद झाल्यानंतर आठ महिन्यांनी मार्च 2019 मध्ये त्यांच्या दोन्ही भावांनी काश्मीरच्या सुरनकोटमध्ये झालेल्या सैन्याच्या भरती प्रक्रियेत भाग घेतला होता.
सैन्याच्या भरतीवेळी दोन्ही भावांनी शारीरिक आणि लेखी परीक्षाही पास केली होती. त्यानंतर त्यांची मुलाखतही घेण्यात आली होती. या सर्व प्रक्रियेला जवळपास 45 दिवसांचा कालावधी लागला. यानंतर पोलीस पडताळणीनंतर दोन्ही भाऊ सैन्यदलात भरती झाले आहेत.
पोलीस पडताळणीनंतर त्यांनी राजौरीमध्ये तीन आठवड्यांचं सैन्यदलाचं प्राथमिक प्रशिक्षणही घेतलं आहे. ज्यात मोहम्मद तारीक आणि मोहम्मद शब्बीर यांनी महत्त्वाच्या गोष्टी शिकून घेतल्या आहेत. प्राथमिक प्रशिक्षणानंतर मोहम्मद तारीक आणि मोहम्मद शब्बीर यांनी सोमवारी औपचारिकरित्या सैन्यदलात प्रवेश केला. भरतीनंतर आता दोन्ही भाऊ रांचीमधील पंजाब रेजिमेंटल सेंटरमध्ये जातील, ज्याठिकाणी त्यांना 10 ते 11 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षणानंतर पासिंग आऊट परेडनंतर त्यांना पुन्हा त्यांच्या यूनिटमध्ये पाठवलं जाईल.
शहीद औरंगजेब यांच्यासह 14 जणांना ‘शौर्य चक्र’ने गौरव
मागील स्वातंत्र्यदिनी शहीद रायफलमन औरंगजेब यांचा शौर्यचक्राने सन्मान करण्यात आला होता. 2018 मध्ये 14 जून रोजी दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफल्सच्या औरंगजेब खान यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली. हत्येआधी दहशतवाद्यांनी औरंगजेब यांचा एका व्हिडीओ बनवला होता, ज्यात अनेक वेदना होत असतानाही औरंगजेब म्हणत होते की, होय, मीच दहशतवाद्यांना मारलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement